नागरिकांनी कररूपाने दिलेल्या पैशांतून महोत्सव भरवण्याच्या निर्णयावर जोरदार टीका होऊनही नगरसेवकांना मात्र स्वप्रसिद्धीची मोठीच हौस असल्यामुळे तब्बल पन्नास लाख रुपये खर्च करून चार महोत्सव भरवण्याच्या निर्णयावर राजकीय पक्ष ठाम राहिले आहेत. या महोत्सवांना आर्थिक तरतूद नसल्यामुळे विकासकामांचे पैसे महोत्सवांसाठी वर्ग करण्याच्या निर्णयाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली.
महापालिका महोत्सवांच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी होते हा अनुभव ताजा असतानाच आता आणखी चार महोत्सव साजरे करण्याचा घाट घालण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले जयंती (३ जानेवारी) ते जागतिक महिला दिन (८ मार्च) या कालावधीत महापालिकेच्या वतीने युथ फेस्टिव्हल आणि महिला महोत्सवाचे आयोजन होणार आहे. तसेच युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुरुषोत्तम करंडकच्या धर्तीवर महापौर करंडक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. विशेष म्हणजे महोत्सव भरवण्याचा निर्णय आधी सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकमताने घेतला आणि नंतर स्थायी समितीनेही त्याला कोणतीही चर्चा न करता एकमताने मंजुरी दिली.
महापालिकेकडे सध्या विकासकामांना निधी नसल्यामुळे तसेच उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे नवी विकासकामे हाती घेऊ नका, अशा तोंडी सूचना खातेप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. ही परिस्थिती पाहता यंदाच्या अंदाजपत्रकातील तीस ते चाळीस टक्के एवढीच विकासकामे होतील, असे चित्र आहे. विकासकामे होत नसल्यामुळे नगरसेवकांकडून मोठी ओरडही होत आहे. महोत्सवांना मात्र विनाचर्चा व एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.

महोत्सवांपाठोपाठ महापौर चषक क्रीडा स्पर्धा
महापालिका महोत्सवाचा वाद सुरू असताना आणि महोत्सवांवरील उधळपट्टीवर शहरात टीका होत असताना स्थायी समितीने महापौर चषक क्रीडा स्पर्धाना मंगळवारी मंजुरी दिली. या स्पर्धासाठी दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपये खर्च येणार आहे. महापौर चषक क्रीडा स्पर्धामध्ये गेल्यावर्षी मोठे गैरप्रकार झाले होते. तसेच स्पर्धा आयोजनाबाबतही वाद झाले होते. महापौर चषक स्पर्धामध्ये गेली दोन वर्षे राजकारणही होत असून यातील एकेका खेळाच्या स्पर्धा आपापल्या भागात भरवण्यासाठी नगरसेवकांचा अट्टाहास असतो. यंदाही तसाच प्रकार होणार आहे. तब्बल सव्वादोन कोटी रुपये खर्च करून होत असलेल्या या स्पर्धेबाबतही सर्व राजकीय पक्षांचे एकमत झाले असून स्पर्धा भरवण्यावर सर्व पक्ष ठाम आहेत.