नो-पार्किंगमधून वाहने उचलणाऱ्या टेम्पोवर पोलिसांना मदत करणारे कामगार हे काम कमी पैशात का करतात, याचा जावईशोध वाहतूक पोलिसांनी लावला आहे. त्यांच्या मते, या कामगारांच्या घरातील इतर सदस्य कमवते आहेत. तसेच, हे कामगार स्वत: अल्पशिक्षित असून इतरत्र काम मिळत नसल्यानेच येथे काम करतात आणि टेम्पो मालकाकडून मिळणाऱ्या पैशांवर भागते.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नो-पार्किंगमधील वाहने उचलणाऱ्या टेम्पोंची संख्या आणि त्यांनी वर्षभरात उचललेल्या दुचाकींची माहिती लोकहित फाऊंडेशनचे अध्यक्ष अझर खान यांनी माहितीच्या अधिकारीखाली काढली होती. शहरात दुचाकी उचलण्यासाठी महिन्याला साधारणत: चौदा ते सोळा टेम्पो पोलिसांकडून वापरले जातात. २०१४ या वर्षांत एकूण १७२ टेम्पोंनी मिळून ७३ हजार ६६१ दुचाकी नो-पार्किंगमधून उचलली, असी माहिती त्यांना देण्यात आली होती. या हिशेबानुसार चौदा ते पंधरा टेम्पोंनी (काही दिवस सोडून) ३२५ दिवसांमध्ये ७३ हजार दुचाकी वाहने उचलली आहेत. म्हणजे एक टेम्पो दिवसाला सोळा वाहने उचलत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. एक टेम्पो एका वेळी साधारण आठ दुचाकी वाहने उचलतो. त्यासाठी एका टेम्पोला दोन फेऱ्या कराव्या लागतात. टेम्पो मालकाला करारनाम्याप्रमाणे प्रत्येक दुचाकीचा पन्नास रुपये टोईंग चार्ज घेतला जातो. सोळा दुचाकींमागे त्यांना आठशे रुपये मिळतात. एका टेम्पोवर साधारण चार मुले काम करतात. त्यांचा पगार हा किमान वेतन कायद्यानुसार दिवसाला बाराशे रुपये इतका असायला हवा. शिवाय टेम्पोसाठीचे इंधन आणि त्याचा देखभालीचा खर्च चारशे रुपये असे एकूण सोळाशे रुपये खर्च होतात. मात्र, पुणे वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार एक टेम्पो दिवसाला वाहने उचलण्यास सोळाशे रुपये खर्च करतो आणि त्यांना मात्र फक्त आठशे रुपये मिळतात.
यामागे मोठे गौडबंगाल असून मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप खान यांनी केला होता. याबाबत त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त तसेच, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांना निवेदन दिले आहे. या प्रकरणी चौकशी करून भ्रष्टाचार उघडकीस आणावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.
यावर वाहतूक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्याची माहिती खान यांना दिली आहे. वाहने उचलण्यासाठी करारावर असलेले १८ पैकी १४ टेम्पोंचे मालक व त्यावरील ४३ कामगारांचे जबाब वाहतूक पोलिसांनी नोंदविले आहेत. त्यांच्या जबाबानुसार टेम्पोचा खर्च दररोज टोईंग केलेल्या चार्जेसमधून भागत असून त्या बद्दल त्यांची कोणतीही तक्रार नाही, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे. तसेच, वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकास शंभर रुपयांची पावती देऊन तडजोड रक्कम वाहन चालकाकडून वसूल करण्यात येते. दिवसभराची तडजोड रक्कम एकत्रित करून रोजच्या रोज शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात येते. टोईंग चार्जेसचे पैसे परस्पर टेम्पो चालकास जागेवरच वाहन चालकाकडून मिळत असतात. या पैशातून ते त्यांचा खर्च भागवतात, अशी विविध कारणे सांगून खान यांच्या अर्जात काहीच तथ्य नसल्याचे वाहतूक पोलिसांनी म्हटले.