‘दीपावलीच्या सणाला थंडी असते..’ हे विधान आता गैरलागू झाले आहे, कारण गेली काही वर्षे उबदार वातावरणातच दिव्यांचा सण साजरा करावा लागत आहे. आताचे वर्षसुद्धा त्याला अपवाद नाही. सध्या ढगाळ वातावरण असून, पुढील दोन दिवस त्यात काही फरक पडण्याची शक्यता नाही. पाडव्याच्या दिवशी (शुक्रवारी) तर पुण्याच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दिवाळीतील अभ्यंग स्नानाचा पहिला दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. तो गुरुवारी पार पडला. मात्र, पुण्यात गुरुवारची सकाळ उजाडली ती काहीशा ढगाळ वातावरणात. त्यामुळे हवेत गारवा होता, मात्र अपेक्षित थंडी नव्हती. गुरुवारी सकाळी १७.७ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. हा आकडा सरासरीच्या तुलनेत ०.३ अंशांनी अधिक होता. पुण्याप्रमाणे आसपासच्या परिसरातही असेच वातावरण होते. विशेष म्हणजे संपूर्ण दिवाळीत हवामानाचे असेच चित्र राहणार आहे. त्यामुळे अभ्यंगस्नानाच्या दिवशी असणारा थंडीचा कडाका या वर्षीसुद्धा अनुभवायला मिळणार नाही, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.
पुण्यासह राज्याच्या अनेक भागांत सध्या पूर्वेकडून वारे वाहत येत आहेत. आग्नेय अरबी समुद्रावर सध्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याची तीव्रता कमी होते आहे. त्याचबरोबर श्रीलंका आणि जवळ असलेल्या मन्नारच्या आखातावर उंचावर वाऱ्यांचा चक्राकार प्रवाह वाहत आहेत. या सर्व घटकांचा परिणाम म्हणून समुद्रावरून वारे येत आहेत. त्या सोबत बाष्प येत असल्याने सध्या वातावरणात ऊब आहे. अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे. याचाच परिणाम म्हणून पुण्यात गुरुवारी दुपारी उकाडा जाणवत होता. ढगांचे मळभ दूर होण्याची सध्या तरी शक्यता नाही. त्यामुळे संपूर्ण दिवाळीचा सण थंडीविना जाण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी असे वातावरण आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र कोरडे हवामान आहे, असेही वेधशाळेकडून सांगण्यात आले.
पुण्यात गेल्या पाच-सहा वर्षांत दिवाळीमध्ये थंडीचा फारसा कडाका जाणवला नाही. अनेकदा या वर्षीप्रमाणे ढगाळ वातावरणच अनुभवायला मिळाले होते. काही वेळा पावसाचा शिडकावासुद्धा झाला होता. त्यात या वर्षांचीसुद्धा भर पडत आहे.

‘‘पूर्वेकडून बाष्पयुक्त वारे येत असल्यामुळे सध्या पुण्यात ढगाळ वातावरण आहे. हीच स्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत थंडीचा कडाका जाणवणार नाही. याउलट काही भागांत शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.’’
पुणे वेधशाळा