आवक मुबलक, भाव उतरले; घाऊक बाजारात दर ५ ते ८० रुपये किलो

ऑक्टोबर महिन्यातील उष्म्यामुळे सीताफळांची मोठी आवक फळबाजारात झाली आहे. दिवाळीमुळे सीताफळांवर प्रक्रिया करणारे उद्योग बंद आहेत. त्यामुळे सीताफळाचे भाव कोसळले आहेत. घाऊक बाजारात पाच ते ऐंशी रुपये किलो भावाने सीताफळांची विक्री केली जात आहे. सीताफळांच्या हंगामातील दुसरा बहार शेतक ऱ्यांच्या दृष्टीने तोटय़ाचा ठरला आहे.

सीताफळाचा हंगाम जून महिन्यात सुरू होतो. हंगामाची अखेर जानेवारी महिन्यात होते. यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवाळी आहे. दिवाळीत सीताफळांना विशेष मागणी नसते. सीताफळ प्रक्रिया उद्योगातील महिला दिवाळीत सुट्टी घेतात. त्यामुळे प्रक्रिया करणारे उद्योग जवळपास बंद असतात. ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या उष्म्यामुळे सीताफळ खराब होण्याचे प्रमाण वाढीस लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातून सीताफळांची मोठी आवक गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये झाली, असे घाऊक फळबाजारातील विक्रेते युवराज काची यांनी सांगितले.

सीताफळाचे सर्वाधिक उत्पादन पुणे जिल्ह्य़ातील शेतकरी घेतात. दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वडकी गावातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर सीताफळांचे उत्पादन घेतात. या भागातील हवामान सीताफळांना पोषक आहे. त्यामुळे वडकी भागातील सीताफळांची प्रत चांगली असते. सीताफळाचे हंगामात तीन बहर असतात. पहिल्या बहरात सीताफळ उत्पादकांना चांगले पैसे मिळाले. मात्र, दुसऱ्या बहरात ऑक्टोबर महिन्यातील उष्म्याचा फटका सीताफळांना बसला. त्यात दिवाळी आल्यामुळे सीताफळांना फारशी मागणी राहिली नाही. सीताफळावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना दिवाळीत सुट्टी असल्याने सीताफळांची मागणी कमी झाली. एकीकडे आवक मुबलक आणि मागणी कमी असल्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अशीही माहिती काची यांनी दिली.

फळाबाजारातील व्यापारी शेतक ऱ्यांचा माल नाकारू शकत नाही. कारण शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील संबंधावर परिणाम व्हायची शक्यता असते. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून सीताफळ खरेदी केले जात आहे. पर्यायाने व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. अगदी पाच ते ऐंशी रुपये भावाने विक्री करावी लागत आहे. सीताफळांचा तिसरा बहार मार्गशीर्ष महिन्यात सुरू होईल. तेव्हा काही प्रमाणात शेतक ऱ्यांचे नुकसान भरून निघेल, असे काची यांनी सांगितले.

प्रक्रिया उद्योगांकडून शेतक ऱ्यांना हात

गेल्या काही वर्षांत सीताफळापासून तयार करण्यात येणारा गर (पल्प) बासुंदी, आइस्क्रीम, कुल्फी या खाद्यपदार्थात वापरला जातो. सीताफळांवर प्रक्रिया करणारे उद्योग पुणे जिल्ह्य़ात वाढीस लागले आहेत. प्रक्रिया उद्योगांमुळे सीताफळ उत्पादक शेतक ऱ्यांना मदतीचा हात मिळाला आहे, असे निरीक्षण फळबाजारातील विक्रेते युवराज काची यांनी नोंदवले.