जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात प्रशासनाची टाळाटाळ

निगडी येथील माता अमृतानंदमयी मठाच्या विश्वस्तांकडे िपपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची एक कोटी पाच लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. ही थकीत रक्कम वसूल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असले तरी त्यासाठीचा आवश्यक पाठपुरावा करण्यात प्राधिकरण प्रशासन कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निगडी येथील पेठ क्रमांक २१ मध्ये माता अमृतानंदमयी मठाला प्राधिकरणाने २० रुपये प्रति चौरस मीटर या सवलतीच्या दराने आठ हजार ३२७ चौरस मीटर इतकी जागा दिली होती. मात्र, प्राधिकरणाच्या १९९६-९७ च्या विशेष लेखापरीक्षणामध्ये या किमतीला आक्षेप घेण्यात आल्यानंतर प्राधिकरणाने मठाच्या विश्वस्तांकडे अधिमूल्यातील फरकाची ३९ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम मागितली. मात्र फरकाची ही रक्कम विश्वस्तांनी आतापर्यंत

प्राधिकरणाकडे जमा केली नसल्यामुळे मठाच्या विश्वस्तांकडे प्राधिकरणाची मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज असे एक कोटी पाच लाखांचे येणे दिसत आहे.

प्राधिकरणाच्या सभेमध्ये मठाकडे असलेली थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला. या सभेमध्ये मठाच्या विश्वस्तांना मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज भरण्यासाठी एक वर्षांचे हप्ते ठरवून देण्यास मंजुरी देण्यात आली. त्याबाबतचा निर्णय विश्वस्तांना २४ जुलै २०१५ रोजी पत्र पाठवून कळविण्यात आला होता. मात्र त्यानंतरही विश्वस्तांनी प्राधिकरणाची थकबाकी भरली नाही.

विश्वस्तांकडे थकबाकी रकमेची मागणी प्राधिकरणाने वेळोवेळी केली आहे. मात्र तरीही ही रक्कम भरण्यात आलेली नाही. रक्कम भरण्यात येत नाही हे लक्षात आल्यानंतरही प्राधिकरण प्रशासनाने वसुलीसाठी कोणतीही कारवाई केली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

मठाची असमर्थता

माता अमृतानंदमयी मठाकडील अधिमूल्यातील फरकापोटी असणाऱ्या थकबाकीबाबत विचारले असता असता मठातील स्वामी विद्यामित्यानंद पुरी यांनी असमर्थता व्यक्त केली, तसेच रोहिदास कोंडे यांच्याकडून माहिती घेण्यास सांगितले. कोंडे यांना विचारल्यानंतर त्यांनी शासनस्तरावर या विषयासंबंधी मठाकडून काही तरी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, मलाही त्याबाबत पूर्ण माहिती नाही, असे सांगितले.ू

मठाच्या विश्वस्तांकडून शासनाचे एक कोटी पाच लाख रुपये येणे थकले आहे. हे निश्चितच चुकीचे आहे. ही वसुली झाली नाही तर शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे. मात्र, शासन स्तरावर न्याय मिळाला नाही, तर त्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल.

– अ‍ॅड. मोहन अडसूळ, सामाजिक कार्यकर्ते

माता अमृतनंदमयी मठाकडे अधिमूल्यातील फरकापोटी असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. थकबाकी वसुलीसाठी मठाच्या विश्वस्तांकडेही मागणी करण्यात येत आहे.

– सुरेश जाधव,  कार्यकारी अधिकारी, िपपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण