औंध भागात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांकडून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कंपनीला मिळालेल्या ठेक्याची माहिती आधिकारात महापालिकेडून माहिती घेऊन तीन जणांनी कंपनीच्या संचालकांना धमकावून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी ओंकार दिलीप कदम, गजेंद्र मोरे, सूरज दगडे यांना अटक करण्यात आली आहे. निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी नितीन प्रकाश पायगुडे (वय ३४) यांनी यासंदर्भात चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीला औंध येथील राजीव गांधी पूल ते वेधशाळा चौक दरम्यान बीआरटी मार्ग तसेच स्मार्ट सिटीचे योजनेंतर्गत औंध येथील परिहार चौक ते ब्रेमेन चौक दरम्यानचे काम मिळाले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून हे काम सुरु करण्यात आले आहे.

महापालिकेच्या प्रक्रिया पार पाडून या कामाचा ठेका आमच्या कंपनीला मिळाला असल्याचे पायगुडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या कंपनीचे बाळासाहेब पासलकर, नरेंद्र पासलकर, योगेश पासलकर, निखिल पासलकर हे भागीदार आहेत. या कामाच्या निविदेची माहिती ओंकार कदम, गजेंद्र मोरे यांनी माहिती अधिकारात मिळवली होती.

बुधवारी (२६ एप्रिल) दुपारी परिहार चौकात सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी आरोपी कदम, मोरे, दगडे आले. त्यांनी तेथे गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी काम बंद करण्यास सांगून गाडय़ांची तोडफोड करण्याची धमकी दिली. तेव्हा पायगुडे तेथे गेले. निविदा भरुन हे काम मिळवलेले आहे, असे पायगुडे यांनी सांगितले. तेव्हा आरोपींनी त्यांना पुन्हा धमकावले. तुमच्या कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. तुमचे काम रद्द करतो, अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर गुरुवारी (२७ एप्रिल) आरोपी पुन्हा तेथे आले. त्यांनी पुन्हा पायगुडे यांना धमकावले.

माहिती अधिकाराचा अर्ज मागे घेतो, त्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी द्या,अशी धमकी त्यांनी दिली. पायगुडे यांनी कंपनीचे संचालक पासलकर यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक एम. एन. पालमपल्ले तपास करत आहेत.