मलनिस्सारण वाहिनीमध्ये साफ सफाई करत असताना गुदमरुन महापालिकेच्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवडमधील औंध-राहटणी रस्त्यावर बुधवारी अकराच्या सुमारास ही घटना घडली. भारत भीमराव डावकर अस गुदमरून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथे मलनिस्सारण वाहिन्या वारंवार तुंबत असल्याने त्यातील मैला काढण्याचे काम सुरू होते. सफाईसाठी कंत्राटी कामगार सकाळपासून काम करत होते.

मयत कामगार आपल्या एका साथीदारासह वाहिनीमध्ये उतरला होता. श्वास न घेता आल्यामुळे दोघेही बेशुद्ध पडले. त्यातील एकाला नागरिकांनी बाहेर काढले तर दुसऱ्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. भारतला उपचारासाठी औंध रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा अधिक तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.
जीव धोक्यात घालून कंत्राटी कामगार नाले सफाईसाठी खोल खड्यात उतरतात. मात्र महापालिका किंवा ठेकेदारांकडून त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही. या घटनेनंतर प्रशासन आणि ठेकेदारांना जाग येणार का हे पाहावं लागेल.