देशभक्ती युवा मंचच्या माध्यमातून राज्याच्या महाविद्यालयांमधील तरुणांना नक्षलवादी चळवळीशी जोडणारा नक्षलवादी अरुण भेलके ऊर्फ संजय कांबळे ऊर्फ राजन (वय ३८, रा. चंद्रपूर) आणि त्याची पत्नी कांचन या दोघांना दहशतवादविरोधी पथकाने पुण्यात पकडले. भेलके गेल्या एका वर्षांपासून विविध नावाने पुण्यात राहत होता. त्याच्यावर चंद्रपूर येथे बेकायदेशीर गुन्हा दाखल असल्यामुळे चंद्रपूर पोलिसांकडे त्याला देण्यात येणार आहे. या दोघांनाही मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दहशतवादविरोधी पथकाने कांचन हिच्याकडूनही महत्त्वाचे साहित्य जप्त केले आहे.
भेलके हा चंद्रपूर येथील बल्लारशा आंबेडकरनगर या ठिकाणचा राहणारा आहे. तो देशभक्ती युवा मंचचा अध्यक्ष होता. या मंचच्या माध्यमातून सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेकरिता तरुणांची भरती करण्याचे काम करीत होता. नक्षल चळवळीमध्ये तो एक कुशल संघटक म्हणून ओळखला जातो. त्याचा नक्षल चळवळीतील प्रमुखांशी जवळचा संपर्क आला होता. जानेवारी २००८ मध्ये चंद्रपूर पोलिसांनी भेलके व इतर काही जणांच्या घरावर छापे टाकून त्यांच्याकडून नक्षलवादी साहित्य जप्त केले होते. त्याबरोबरच काही शस्त्रास्त्र जप्त केली होती. या प्रकरणी चंद्रपूर पोलीस ठाण्यात भेलकेसह बारा जणांना अटक केली होती. मात्र, जामीन मिळाल्यापासून भेलके व त्याची पत्नी कांचन हे फरार होते. त्याने संघटनेचा गाशा गुंडाळला होता. तो ठाणे किंवा अहमदाबाद शहरात वेगळय़ा नावाची संघटना स्थापन करून नक्षलवाद्यांसाठी काम करत आहे, अशी गुप्तचरांची माहिती होती. तेव्हापासून नक्षलवादविरोधी अभियानातील पोलिस, तसेच राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी त्याच्या मागावर होते.
राज्य दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हिमांशू रॉय यांना मिळालेल्या माहितीनुसार भेलके याला एटीएसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी पुण्यातील कासेवाडी भागातून अटक केली. त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे. भेलके याच्याकडे चौकशी केल्यानंतर ते गेल्या एका वर्षांपासून पुण्यात वेगवेगळ्या नावाने राहत होता. तो मोबाइल वापर नव्हता. पुण्यात ‘मास मूव्हमेन्टच्या’ माध्यमातून १८ ते २२ वयोगटातील तरुणांशी संपर्कात राहून त्यांना नक्षलवादी विचारांकडे ओढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे. त्याने शहर आणि परिसरात काही नक्षल चळवळीसंदर्भात काय केले आहे याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती बर्गे यांनी दिली.
यापूर्वी पुणे एटीएसने २०११ मध्ये देशभक्ती युवा मंचच्या मयूरी भगत आणि अनुराधा सोनुले यांना पुण्यातील कबीर कला मंचच्या काही कार्यकर्त्यांसोबत अटक केली होती.