आता चिरलेल्या भाज्या आणि फळांचीही खरेदी ‘ऑनलाईन’ होऊ शकणार आहे. बंगळुरू, मुंबई आणि हैद्राबादमध्ये ऑनलाईन किराणा दुकान सेवा पुरवणाऱ्या एका खासगी संकेतस्थळाने पुण्यातही सेवा देण्यास सुरुवात केली आहे. या संकेतस्थळाद्वारे ग्राहकांना किराणा दुकानाच्या रांगेत न थांबता देखील घरबसल्या महिन्याचा किराणा भरता येणार आहे. इतकेच नव्हे तर चिरलेल्या भाज्या आणि फळेही ऑनलाईन मागवता येणार आहेत.
‘बिगबास्केट डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या पुण्याच्या कार्यकारी प्रमुख ललिता अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भाज्या, फळे, धान्य, दूध, ब्रेड व बेकरी पदार्थ, ब्रँडेड पदार्थ, चिकन, मटण, मासे, अंडी आणि काही गृहोपयोगी वस्तू या संकेतस्थळावर खरेदी करता येऊ शकतील. ताथवडे येथील प्रमुख केंद्रातून भाज्या, फळे आणि किराणा मालाचा पुरवठा केला जाणार आहे. परंतु माल घरपोच मिळणार असला तरी काहीच वस्तू घेणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त वितरण शुल्क भरावे लागणार आहे. ‘एक हजार रुपयांखालच्या प्रत्येक खरेदीवर वीस रुपये अतिरिक्त वितरण शुल्क घेतले जाईल; एक हजारापेक्षा अधिक खरेदीचे वितरण विनामूल्य होईल,’ असे अगरवाल यांनी सांगितले.  
किराणा मालाच्या ऑनलाईन खरेदीबाबतची निरीक्षणे कंपनीचे राष्ट्रीय प्रमुख सेशु कुमार यांनी नोंदवली. ते म्हणाले,‘‘आमच्या संकेतस्थळावर सुमारे ५ लाख नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यातील साडेतीन लाख नागरिक प्रत्यक्ष खरेदी करतात. हे ग्राहक दर १० ते १२ दिवसांनी किराणा मागवत असल्याचे दिसून येते. तसेच एकदा ऑनलाईन किराणा खरेदी केलेल्यांपैकी ८५ टक्के ग्राहक पुन्हा खरेदी करत असल्याचेही निरीक्षण आहे.’’