स्मार्ट सिटी अभियानात पुणेकरांचा सहभाग वाढवण्यासाठी महापालिकेने आणखी एक पाऊल उचलले आहे. ‘माझं स्वप्न-स्मार्ट पुणे’ या विषयावर आलेल्या साडेसहा हजारांहून अधिक सूचनांमधून दिल्लीतील तज्ज्ञ संस्थेमार्फत ३० सूचना निवडण्यात आल्या असून, या सूचनांवर आता ऑनलाइन मतदान घेण्यात येणार आहे. मतदान २ ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि ९ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता त्याची मुदत संपल्यानंतर लगेच त्याचा निकालही जाहीर होईल.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात सहभागी होत असताना पुणे शहरातील सुधारणांबाबत पुणेकरांकडून अडीचशे शब्दांपर्यंतच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देत पुणेकरांनी सात दिवसांत सहा हजार ६५३ सूचना केल्या. आलेल्या सूचनांमधून ३० चांगल्या सूचनांची निवड करण्याचे काम दिल्लीतील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अर्बन अफेअर या संस्थेला देण्यात आले होते. आलेल्या सूचनांमधून चांगल्या सूचना निवडताना प्रामुख्याने सूचनेची व्यावहारिकता, स्पष्टता, सर्जनशीलता आणि संभाव्य परिणाम या चार मुद्यांचा विचार करण्यात आला. या चार मुद्यांच्या आधारे आलेल्या सूचनांमधून दिल्लीतील संस्थेने ३० सूचना निवडल्या असून, त्यातून सवरेत्कृष्ट दहा सूचनांची निवड आता पुणेकरांनी मतदान करून करायची आहे.
दुसऱ्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या ३० सूचना महापालिकेने स्मार्ट सिटीसाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर २ ऑगस्टपासून पाहायला मिळतील. त्यातील १० सवरेत्कृष्ट सूचना ऑनलाइन मतदानाने निवडायच्या असून ९ ऑगस्टपर्यंत त्यासाठी मतदान करता येईल. प्राधान्यक्रमानुसार हे मतदान करायचे आहे.
नागरिकांकडून निवडण्यात आलेल्या दहा सवरेत्कृष्ट सूचनांवर तिसऱ्या टप्प्यात सविस्तर विचारविनिमय होईल. या सूचना ज्यांनी केल्या आहेत त्यांना महापालिकेतर्फे सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाईल. सूचना केलेल्यांनी १२ ऑगस्ट रोजी सूचनेबाबतचे सादरीकरण महापालिकेत करायचे असून, या वेळी कल्पना सारांशरूपाने सांगून त्याबाबतची व्यावहारिकताही मांडायची आहे. सादरीकरण झाल्यानंतर तज्ज्ञांच्या समितीकडून तीन चांगल्या सूचना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी निवडल्या जातील. या सूचनांना बक्षिसेही दिली जाणार आहेत.

ऑनलाइन मतदानासाठी पुढील संकेतस्थळांचा वापर करता येईल-
 smartcity.punecorporation.org   किंवा
punesmartcity.in
 
स्मार्ट सिटी अभियानात नागरिकांच्या सहभागासाठी महापालिकेने सूचना मागवण्याचा तसेच ऑनलाइन मतदान घेण्याचा जो उपक्रम सुरू केला आहे, तशाच पद्धतीने आलेल्या सूचनांमधून चांगल्या सूचना निवडण्याची पद्धतीही सर्वासाठी खुली करण्यात आली आहे. त्यानुसार चांगल्या सूचना निवडण्याचे कामही नागरिकांनीच करायचे आहे.
कुणाल कुमार
आयुक्त, पुणे महापालिका.