एक कोटी एसएमएस पॅकसाठी १६ लाख रुपये

अपेक्षित माहिती मिळत नसल्याने एकाच कामासाठी सतत हेलमाटे मारून कंटाळलेल्या नागरिकांसाठी दिलासा देणारा निर्णय पिंपरी महापालिकेने घेतला आहे. पालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘ऑनलाइन’ कामकाजासंबंधीची माहिती आता मोबाइलवर ‘एसएमएस’द्वारे दिली जाणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचा युक्तिवाद पालिका अधिकारी करत आहेत.

पिंपरी पालिकेच्या वतीने विविध विभागाच्या जवळपास ४० ते ४५ प्रकारच्या सेवा ऑनलाइन प्रणालीद्वारे देण्यात येतात. नागरवस्ती विकास योजना, नगररचना विभाग, मनपाचे क्रीडांगण, मिळकत कर विभाग, एलबीटी विभाग, महापालिका रुग्णालय, बांधकाम परवानगी विभाग, क्रीडांगणे अशा अनेक सेवांचा त्यामध्ये समावेश आहे. अशा कामांसाठी नागरिकांना प्रत्येक वेळी महापालिकेत यावे लागते, त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. एकाच फेरीत काम होत नसल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. सतत हेलपाटे मारावे लागतात. अशा परिस्थितीत त्यांना स्वत: कार्यालयात येण्याची वेळ येऊ नये तसेच त्यांच्या कामासंबंधीची माहिती एसएमएसद्वारे इत्थंभूत माहिती देण्याची सुविधा असलेला प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. एक कोटी एसएमएसचे पॅक घेण्यासाठी मान्यता देतानाच यासाठी १६ लाख २० हजार रुपये खर्चास मान्यताही देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांनी सादर केला होता, त्यास समितीने मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या जनजागृती, प्रबोधनाच्या कार्यक्रमांची माहिती, कर भरण्याची मुदत, ‘सारथी’चे संदेश, नगरसेवकांना सभा, बैठकांसाठी निरोप द्यायचे झाल्यास या सुविधेचा वापर चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. नागरिकांना विविध विषयांची माहिती वेळच्या वेळी मिळणार असल्याने त्यांना हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही.

नीलकंठ पोमण, संगणक विभागाचे प्रमुख