टपाल खात्याचा अनेक नागरिकांना दिलासा

बँकेत पैसे आहेत, पण मिळत नाहीत, अशी काहीशी अवस्था सध्या सर्वत्र आहे. एटीएम समोरील रांगा कमी होण्याची चिन्हे नाहीत. बँकेतूनही नागरिकांना पुरेशी रक्कम मिळत नाही. या सर्व गडबडीत टपाल खात्याने मात्र अनेक नागरिकांना दिलासा दिला आहे. आजही टपाल कार्यालयात जाऊन खाते उघडले आणि त्यात जुन्या नोटांद्वारे रकमेचा भरणा केल्यास खातेदाराला त्याच दिवशी लगेचच २४ हजार रुपये काढता येतात. अगदी २५ हजारांचा भरणा करूनही २४ हजार रुपये काढता येऊ शकतात.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर बँकांप्रमाणे टपाल कार्यालयातही जुन्या नोटा बदलून मिळत होत्या. त्याचबरोबरीने टपाल कार्यालयात बचत खाते असणाऱ्यांकडून जुन्या नोटांचा भरणाही करण्यात आला. खात्यावर जुन्या नोटांचा भरणा बँकांप्रमाणे टपाल खात्यात अद्यापही सुरू आहे. पुणे जीपीओच्या अंतर्गत येणाऱ्या टपाल कार्यालयांमध्ये महिन्याला वेगवेगळ्या प्रकारची सुमारे सव्वादोनशे खाती उघडली जातात. मात्र नोटाबंदीच्या महिन्यात या खात्यांची संख्या ५१५ इतकी झाली आहे. सध्या २३ हजारांहून अधिक नागरिकांची वेगवेगळी खाती टपाल कार्यालयात आहेत.

रोख रक्कम मिळविण्यासाठी शहरभर सकाळपासूनच बँकांमध्ये नागरिक गर्दी करीत आहेत. सुरू असलेल्या एटीएमवर भल्या मोठय़ा रांगा लागल्याचे चित्र कायम आहे. बँका व एटीएममधून पुरेशी रक्कम नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे दररोज बँक व एटीएमच्या रांगेत उभे राहण्याचा अनेकांचा नित्यक्रमच झाला आहे. या परिस्थितीमध्ये टपाल खात्यातील वातावरण मात्र वेगळे आहे. एका आठवडय़ाला टपाल कार्यालयाच्या बचत खात्यातून नागरिकांना २४ हजारांची रक्कम काढता येते. जीपीओ कार्यालयीतील एटीएम केंद्रावरही रक्कम उपलब्ध करून देण्यात येते. या केंद्रात रोजच रोकड भरली जाते.

टपाल कार्यालयात यापूर्वी खाते असणाऱ्यांनाच नव्हे, तर नव्याने खाते काढून त्यात जुन्या चलनाद्वारे रक्कम भरल्यास त्याच दिवशी २४ हजारांची रक्कम दिली जाते. जुन्या नोटांद्वारे कितीही रकमेचा भरणा स्वीकारला जातो. त्याचप्रमाणे नव्या व चलनात असलेल्या नोटांद्वारे तर कितीही रकमेचा व्यवहार केला जातो. त्यामुळे चलनटंचाईतही अनेक नागरिकांना दिलासा मिळतो आहे. टपाल कार्यालयात बचत खाते काढण्यासाठी पॅन कार्ड व आधार कार्डची आवश्यकता आहे. नागरिकांनी टपाल खात्यातही बचत खाते उघडण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जीपीओकडून करण्यात आले आहे.

जाहिरात करीत नसल्याने टपाल कार्यालयातील बचत खाते, धनादेश, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आदींची माहिती अनेकांना नाही. सद्य:स्थितीत खातेदारांकडून जुन्या नोटांचा भरणा स्वीकारून आठवडय़ाला २४ हजार रुपये खात्यातून काढता येतात. खाते उघडले त्याच दिवशी खातेदाराला २४ हजार रुपये दिले जातात. टपाल कार्यालयात खाते असणाऱ्यांना सध्या रोख रकमेबाबत समस्या नाही. खातेदाराला त्याच्या मोबाइलवर व्यवहाराचा एसएमएसही पाठविला जातो. नागरिकांनी टपाल कार्यालयात बचत खाते उघडण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे.

– आर. एस. गायकवाड, जीपीओ वरिष्ठ पोस्ट मास्टर