पिंपरीच्या राजकारणात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद ताकद होती, तेव्हा ‘राष्ट्रवादी विरुद्ध सर्व’ असे चित्र शहरात होते. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे स्थान बळकट झाल्यानंतर सर्व विरोधकांनी एकत्र येऊन आता भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या संयुक्त विरोधकांनी आतापासूनच विरोधी वातावरणनिर्मिती करण्यास प्रारंभ केला आहे.

भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बैठक चिंचवडमध्ये झाली, त्यानिमित्ताने भाजपचे विरोधक एकत्र आले. चिंचवड स्टेशन येथे मंडप टाकून दोन दिवस संयुक्त आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार राजू शेट्टी यांनीही या आंदोलनाला हजेरी लावली. शहर शिवसेनेने थेट सहभाग दाखवला नाही. केंद्रातील तसेच राज्यातील सरकारच्या विरोधात घोषणाबाजी झाली. पिंपरी पालिकेतील गैरकारभाराकडे लक्ष वेधण्यात आले. विरोधकांच्या या एकजुटीचे कोणालाच आश्चर्य वाटले नाही. कारण, त्यांच्यासमोर दुसरा पर्याय राहिला नाही. पूर्वी, राष्ट्रवादीच्या विरोधात इतर पक्ष येत होते. तेव्हा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वाचे लक्ष्य होते. मात्र, गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे  पानिपत झाले. भाजपने ‘३ वरून ७७ पर्यंत’ गरूडझेप घेतली. पूर्वीच्या तुलनेत भाजपची ताकद शहरात कित्येकपटीने वाढली आहे. गल्लोगल्ली भाजप कार्यकर्त्यांची फळी तयार झाली आहे. भाजपशी थेट सामना करणे, हे कोणा एकटय़ा-दुकटय़ाचे काम राहिले  नाही. राष्ट्रवादीचे पूर्वीइतके बळ राहिलेले नाही.

बहुतेक नेते, कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. सद्य:स्थितीत काँग्रेस, शिवसेना, मनसे हे पक्ष शहर पातळीवर दुबळ्या गटात मोडतात. त्यामुळे यापुढे ‘भाजप विरोधात सर्व’ असेच शहरातील राजकारण राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार की वेगवेगळ्या, यावर बरेच अवलंबून राहणार आहे. सध्या शिवसेनेचे दोन खासदार व एक आमदार आहे. हे संख्याबळ टिकवण्याचा तसेच वाढवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे. स्वतंत्रपणे निवडणुका झाल्यास या जागांवर भाजपचा डोळा राहणार आहे. भाजपची वाढलेली ताकद पाहता दोन्हीकडे भाजपला यश मिळू शकते, याची विरोधकही खासगीत कबुली देत आहेत. त्यामुळे पुढील राजकीय गणिते डोळ्यासमोर ठेवून भाजपला आतापासूनच घेरण्याची नीती विरोधकांनी सुरू केली असल्याचे मानले जात आहे.