पालिका सभेत गोंधळ, महापौरांचा निषेध
पिंपरी पालिकेच्या ताब्यात असलेली चिखली-जाधववाडी येथील ४७ गुंठे मोक्याची जागा संगनमताने बांधकाम व्यावसायिक असलेल्या एका शिक्षणसम्राटाच्या संस्थेच्या घशात घालण्याचा डाव सत्ताधारी नेत्यांनी रचला आहे. सोमवारी सभेत याबाबतचा प्रस्ताव चर्चेला येताच राष्ट्रवादीचे दत्ता साने, अपक्षांचे गटनेते सुरेश म्हेत्रे आणि मनसेचे राहुल जाधव यांनी विरोध करत सभागृहात फलकबाजी केली. महापौरांचा निषेध करून सभात्यागही केला. वादग्रस्त ठरलेला हा प्रस्ताव महापौरांनी अखेर पुन्हा तहकूब ठेवला.
पिंपरी पालिकेचे जाधववाडी येथील १८० गुंठे जागेवर शाळेचे आरक्षण आहे. त्यापैकी १३३ गुंठे जागा या शैक्षणिक संस्थेने विकत घेतली असून २०१४ मध्ये त्याचे खरेदीखत झाले आहे. उर्वरित ४७ गुंठे जागा पालिकेच्या ताब्यात आहे. ही जागा एक रुपया ४६ पैसे प्रति चौरस फूट या दराने ३० वर्षांसाठी देण्याचा प्रस्ताव सभेपुढे मांडण्यात आला आहे. पालिकेची ‘सुभेदारी’ असलेल्या सत्ताधारी नेत्यांनी पालिकेला खड्डय़ात घालत या संस्थेच्या दृष्टीने फायद्याचा प्रस्ताव मंजूर करण्याचा घाट घातला आहे. तथापि, नगरसेवक साने, म्हेत्रे आणि जाधव यांनी त्यास तीव्र विरोध दर्शवला. त्यासाठी त्यांनी सभेत फलकबाजी केली. या विषयावर बोलू देण्याची मागणी त्यांनी केली. तथापि, महापौरांनी पुढील विषय चर्चेला घेतल्याने महापौरांचा निषेध करून त्यांनी सभात्याग केला. याबाबतची माहिती नगरसेवक दत्ता साने व राहुल जाधव यांनी पत्रकारांना दिली. समाविष्ट गावांमध्ये शाळेची गरज असताना व पालिकेकडील शाळेसाठी उपलब्ध असलेली मोक्याची ४७ गुंठे जागा संगनमताने शिक्षणसंस्थेला देण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सभेत निर्णय होण्यापूर्वीच संस्थेने स्वत:च्या मालकीहक्काचा फलक तेथे लावला आहे. या प्रस्तावामागे मोठे अर्थकारण असून त्यातून पालिकेचे नुकसान होणार आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.