‘एनडीए’च्या १३० व्या तुकडीतील स्नातकांना पदवी प्रदान
देशातील बाह्य़ आणि अंतर्गत धोके वाढत असतानाच तंत्रज्ञानातही मोठय़ा प्रमाणावर बदल होत आहेत. ही बाब ध्यानात घेऊन संरक्षणविषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढणे आवश्यक आहे, असे मत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे ( एआयसीटीई) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी सोमवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३० व्या तुकडीचा पदवीप्रदान समारंभ डॉ. सहस्रबुद्धे यांच्या हस्ते पार पडला. प्रबोधिनीचे प्रमुख कमांडंट व्हाइस अ‍ॅडमिरल जी. अशोककुमार, उपप्रमुख आणि अधिष्ठाता एअर मार्शल संदेश वागळे, प्राचार्य ओ. पी. शुक्ला या वेळी उपस्थित होते. १३० व्या तुकडीतील २९८ स्नातकांना दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. ६४ स्नातकांना कला शाखेची, ११० स्नातकांना विज्ञान शाखेची आणि १२४ स्नातकांना कॉम्प्युटर सायन्सची पदवी देण्यात आली. यामध्ये मित्र देशांच्या सहा स्नातकांचा समावेश आहे.
‘एनडीए’ ही संरक्षणविषयक प्रशिक्षण देणारी जगातील सवरेत्कृष्ट संस्था आहे. त्यामुळे या संस्थेतील स्नातकांनी बदलते तंत्रज्ञान वेगाने आत्मसात करून अद्ययावत राहिले पाहिजे. अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो-लाखो स्नातकांना दरवर्षी पदव्या मिळतात. मात्र, तुम्ही प्रबोधिनीचे स्नातक मातृभूमीच्या रक्षणासाठी खडतर प्रशिक्षणाबरोबरच शिक्षण घेत आहात. त्यामुळेच तुम्हाला मिळणाऱ्या पदवीचे मोल अधिक आहे, असेही सहस्रबुद्धे यांनी सांगितले. शुक्ला यांनी शैक्षणिक कामगिरीचा आढावा घेतला. वागळे यांनी आभार मानले.

इंजिनिअिरगचा बी. टेक अभ्यासक्रम
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) नौदलाच्या स्नातकांसाठी आता इंजिनिअिरगचा बी. टेक अभ्यासक्रम सुरू होणार आहे. प्रबोधिनीमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या पुढील तुकडीपासून हा अभ्यासक्रम सुरू होईल. त्यानंतर हवाई दलाच्या स्नातकांसाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. बारावीनंतर प्रबोधिनीमध्ये दाखल झालेले स्नातक तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण घेतात. त्यानंतर त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची बीए, बीएस्सी किंवा बीएस्सी कॉप्म्युटर सायन्स यापैकी एक पदवी मिळते. आता नव्या सुविधेनुसार नौदलाचे स्नातक प्रबोधिनीमध्ये बी. टेक अभ्यासक्रमाची तीन वर्षे पूर्ण करतील. त्यानंतर उर्वरित एक वर्षांचा अभ्यासक्रम ते एझिमला येथील ‘इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी’मधील प्रशिक्षणादरम्यान पूर्ण करतील. ही पदवी देखील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडूनच दिली जाणार आहे.