अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर राज्यात होणाऱ्या अन्य साहित्य संमेलनांनाही अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशा पद्धतीची साहित्य संमेलने आयोजित करणाऱ्या साहित्य संस्थांना विहित नमुन्यातील अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून सप्टेंबरअखेपर्यंत आलेल्या अर्जाचा अनुदानासाठी विचार केला जाणार आहे.
राज्य सरकारतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यासाठी दरवर्षी राज्याच्या अर्थसंकल्पामध्येच या रकमेची तरतूद केली जाते. यापूर्वी हे अनुदान सांस्कृतिक विभागामार्फत दिले जात होते. त्याचप्रमाणे साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या संस्थेला अनुदानाच्या रकमेचा धनादेश दिला जात होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत हे अनुदान अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला दिले जात आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर राज्यामध्ये विविध संस्थांमार्फत मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते. या साहित्य संमेलनांसाठी सरकारने आर्थिक पाठबळ द्यावे अशी मागणी संमेलनाच्या आयोजक संस्थांतर्फे सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल घेत अखेर सरकारने अशा संमेलनांसाठी अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यासाठी धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीकृत संस्थांनी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावयाचे आहेत. अनुदानासाठी अर्ज करणारी साहित्य संस्था किंवा मंडळ किमान पाच वर्षे साहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे. त्यामुळे संस्थांनी अर्जासोबत पाच वर्षांच्या कामाचा अहवाल जोडणे आवश्यक आहे.
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत मंजूर होणारे अनुदान हे फक्त त्या संबंधित आर्थिक वर्षांसाठीच असेल. या अनुदानाच्या रकमेचा जमा-खर्चाचा तपशील त्या आर्थिक वर्षांमध्येच राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाला सादर करावयाचा आहे. हे अनुदान साहित्य संमेलनाखेरीज अन्य गोष्टीसाठी खर्च केल्यास ती आर्थिक अनियमितता समजून संबंधित संस्थेविरुद्ध गैरव्यवहाराची कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे अनुदान घेत असताना ती रक्कम केवळ साहित्य संमेलनासाठीच खर्च करणार असल्याचे प्रमाणपत्र संस्थेने देणे बंधनकारक आहे. या अनुदानासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या रवींद्र नाटय़ मंदिर इमारत, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई या पत्त्यावर उपलब्ध होणार आहेत.