‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. ए. के. अँटोनी सोनिया गांधी यांना आणि प्रियांका गांधी राहुल गांधी यांना जामीन आहेत. वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पी. चिदंबरम आणि शशी थरूर हे लवकरच तुरुंगात जातील, असे भाकीत करून भाजपनेते खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी काँग्रेसला बैठक आता तुरुंगातच घ्यावी लागेल, असा दावा केला. विविध जातींमध्ये हिंदूंचे विभाजन आणि अल्पसंख्याकांची बेरीज या जुन्या समीकरणातून सत्ता संपादन करता येणार नसल्याच्या नैराश्यातूनच काँग्रेसकडून असहिष्णुतेचे आरोप केले जात असल्याचा दावा भाजप नेते खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी रविवारी केला.

विवेक समूह आणि भारत विकास परिषदेतर्फे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते अणीबाणीविरोधात लढा देणारे स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ‘असहिष्णुता : सत्य की आभास’ या विषयावर स्वामी यांनी संवाद साधला. स्वामी यांच्या हस्ते अणीबाणीत तुरुंगवास भोगणारे नारायण अत्रे, विजया काडगी आणि वसंतराव प्रसादे यांचा सत्कार करण्यात आला. माजी खासदार प्रदीप रावत, विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर आणि परिषदेचे दत्ता चितळे या वेळी उपस्थित होते.

जम्मू-काश्मीरला लागू असलेले ३७० कलम लवकरच हटविले जाईल, असे सांगून स्वामी म्हणाले,‘ मंत्रिमंडळाच्या निर्णयावर राष्ट्रपतींची सही झाली तरच काश्मीरला वेगळा दर्जा देणारे हे कलम दूर करता येऊ शकते. आता रामनाथ कोिवद हे राष्ट्रपती झाले असून त्यांच्या सहीने या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकेल. गोहत्याबंदी हा भाजप सरकारचा कार्यक्रम नाही, तर देशाच्या घटनेनुसारच ही बंदी करण्यात आली आहे. गोरक्षासंदर्भात होत असलेल्या हिंसाचाराच्या घटनेमध्ये सापडलेले भाजपचे कार्यकर्ते नाहीत.’

[jwplayer dy7r2d6R]

राममंदिराची उभारणी लवकरच

अयोध्येमध्ये राममंदिर लवकरच उभारले जाईल, असा विश्वास सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,‘ शरयू नदीच्या पलीकडे मशीद उभारावी हा प्रस्ताव मुस्लिमांना दिला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात याबाबत निर्णय होईपर्यंत थांबण्याचे ठरविले आहे. बाकी नेत्यांना धर्मनिरपेक्ष राहायचे असले तरी मी हिंदूुत्ववादी होऊन मंदिर उभारणीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. मंदिराच्या जागेवर उभारलेल्या मशिदींच्या माध्यमातून हिंदूूंनी इतकी वर्षे असहिष्णुता सहन केली आहे. आता मथुरा आणि काशी येथील जागेवरचा हक्क मुस्लिमांनी सोडून दिला तरच हिंदू मुस्लीम ऐक्य निर्माण होऊ शकेल.’