ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, पद्मभूषण डॉ. पी. व्ही. इंदिरेसन (वय ८५) यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. डॉ. इंदिरेसन हे निवडणूक आयोगाच्या तांत्रिक विभागाच्या बैठकीसाठी पुण्यात आले होते.
डॉ. इंदिरेसन हे वीस वर्षे आयआयटी मद्रासचे संचालक म्हणून कार्यरत होते. आयआयटी मद्रास येथे मूल्यांकनासाठी क्रेडिट पद्धती सुरू करण्याबरोबरच इतरही शैक्षणिक सुधारणेचे जनक म्हणून डॉ. इंदिरेसन यांचा उल्लेख केला जातो. इन्स्टिटय़ूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड टेलेकम्युनिकेशन इंजिनिअर्स, इंडियन नॅशनल अॅकॅडमी फॉर इंजिनिअरिंग या संस्थांचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध समित्यांवरही ते कार्यरत होते. केंद्र शासनाच्या इन्व्हेन्शन्स प्रमोशन बोर्डने त्यांचा पुरस्कार केला होता. त्यांना पद्मभूषण पुरस्कारही देण्यात आला होता. शिक्षण आणि नोकरीमधील आरक्षणाच्या तरतुदीला डॉ. इंदिरेसन यांनी विरोध केला होता. त्याचप्रमाणे आयआयटीसाठी एकच सामाईक प्रवेश परीक्षा ठेवण्याच्या धोरणालाही त्यांचा विरोध होता. आयआयटी मद्रास येथून निवृत्त झाल्यावर ते दिल्ली येथे स्थायिक झाले होते.
डॉ. इंदिरेसन हे निवडणूक आयोगाच्या तंत्रज्ञान समितीचेही अध्यक्ष होते. मतदान यंत्रांबाबत निवडणूक आयोगाच्या तंत्रज्ञान समितीच्या पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी ते आले असताना त्यांचे निधन झाले. ‘‘तंत्रशिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम यांमधील सुधारणांसाठी डॉ. इंदिरेसन यांनी खूप मोठे योगदान दिले आहे,’’ असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी सांगितले.