‘स्वातंत्र्य मिळाल्यास कलावंतांची कला बहरते’

कलेच्या माध्यमातून उत्तम राष्ट्रकारण करणे शक्य आहे, असे मत प्रख्यात चित्रकार रवी परांजपे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. कलावंतांना नेहमी स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, तरच त्यांची कला बहरू शकते, असेही ते म्हणाले.

पिंपरी महापालिकेचे मुख्य छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी टिपलेल्या हंपी येथील छायाचित्रांचे प्रदर्शन चिंचवडगावातील पु. ना. गाडगीळ कलादालनात सुरू झाले, त्याचे उद्घाटन परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सहआयुक्त दिलीप गावडे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, पक्षनेते एकनाथ पवार, माजी महापौर अपर्णा डोके, काँग्रेसच्या महिलाध्यक्षा गिरिजा कुदळे, पु.ना. गाडगीळचे संचालक अजित गाडगीळ आदी उपस्थित होते.

परांजपे म्हणाले,‘ छायाचित्रांच्या माध्यमातून अभिजात कला व त्याची विविध रूपे जगभर सर्वदूर पोहोचू शकतात. त्याचपद्धतीचे काम कशाळीकर यांनी केले आहे.’

आयुक्त हर्डीकर म्हणाले,‘ उत्तम निरीक्षण करणारा चांगल्या प्रकारे छायाचित्रण करू शकतो. कशाळीकर यांनी छायाप्रकाशाचा उत्तम वापर केला आहे.’ सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. नाना शिवले यांनी आभार मानले.