आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लागावा यासाठी चित्रकार पुढे सरसावले आहेत. या मुलांना मदत देण्यासाठी चित्र प्रदर्शन भरवण्यात येणार असून त्यासाठी तीसहून अधिक चित्रकारांनी आपण काढलेली प्रत्येकी दोन चित्रे दिली आहेत. या चित्रांच्या विक्रीतून येणाऱ्या निधीतील लक्षणीय वाटा आत्महत्याग्रस्त शोतकऱ्यांच्या मुलांना दिला जाणार आहे.
चित्र-मित्र परिवार आणि शार्प मास कम्युनिकेशन या संस्थांतर्फे या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ एप्रिलला सकाळी १०.३० वाजता आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. आयोजक राजेंद्र देशपांडे, संजय कांबळे आणि प्रा. चंद्रशेखर कुमावत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे प्रदर्शन तीन दिवस चालणार असून सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळात ते विनामूल्य पाहता येणार आहे.  
 एकूण ३५० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांची यादी संस्थेने तयार केली आहे. या शेतकऱ्यांच्या मुलांना प्रत्येकी किमान १० हजार रुपये देता यावेत अशी संकल्पना आहे, असे देशपांडे यांनी सांगितले. चित्रकार उमाकांत कानडे, श्रीकांत कदम, रुपेश हिरगुडे या व इतरही चित्रकारांनी चित्र प्रदर्शनासाठी आपली चित्रे दिली असल्याचे प्रा. कुमावत यांनी सांगितले.