‘नीट’ रद्द न झाल्यास उपोषण करण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. त्याचबरोबर रविवारी (१ मे) झालेल्या परीक्षेत साधारण ३५ प्रश्न राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमातील नसल्याचेही पालक आणि मार्गदर्शकांचे म्हणणे आहे.
नीटच्या पहिल्या भागाची परीक्षा रविवारी झाली. या परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम होता. या अभ्यासक्रमानुसार आलेल्या प्रश्नातील साधारण ३५ प्रश्न हे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाबाहेरील होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ५४५ गुणांचीच ठरली. त्यामुळे राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश हे राज्याच्या सामाईक प्रवेश परीक्षेच्याच (सीईटी) माध्यमातून झाले पाहिजेत, अशी मागणी पालकांनी केली आहे. नीट रद्द न झाल्यास उपोषण करण्यात येईल असे पालकांनी सांगितले. ‘विद्यार्थ्यांना सीईटी व्यवस्थित देता यावी, यासाठी ५ मे पर्यंत आंदोलन करण्यात येणार नाही. मात्र मंगळवारी (३ मे) न्यायालयाचा निकाल विद्यार्थ्यांच्या हिताचा लागला नाही, तर ७ मे पासून उपोषण करण्यात येणार आहे,’ असे पालकांनी सांगितले.