कचऱ्याचे निर्मूलन, आदिवासी आणि कचरावेचकांना रोजगार आणि त्यातून ग्राहकांना भुरळ घालणाऱ्या उत्पादनांच्या निर्मितीचा व्यवसाय ‘आरोहना इको सोशल डेव्हलपमेंट’ या संस्थेने उभा केला आहे. घरात साठणाऱ्या आणि तेथून कचऱ्याच्या पेटीत जाऊन कचऱ्याच्या विघटनाचा प्रश्न जटील करणाऱ्या वेफर्स, बिस्किटांच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, बंदी असूनही रोजच्या रोज कचऱ्यात दिसणाऱ्या ५० मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या हे या व्यवसायाचे भांडवल आहे.

मूळच्या दादरा-नगर हवेली येथील आणि पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण आणि त्यानंतर अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर पर्यावरण आणि शाश्वत विकास या विषयावर अमिता देशपांडे-परांजपे यांनी काम करण्याचे निश्चित केले.

मात्र स्वयंसेवी संस्था सुरू करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी असलेला व्यवसाय सुरू करण्याचा विचार सुरू झाला. या व्यवसायात नंदन भट हेदेखील भागीदार झाले. या दोघांच्या संकल्पनेतून ‘आरोहना’ ही संस्था उभी राहिली. कचऱ्याच्या विघटनासाठी संस्थेने काम सुरू केल्यानंतर प्लॅस्टिक पिशव्यांच्या कचऱ्यावर काही उत्तर सापडत नव्हते. बंदी असलेल्या ५० मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीच्या पिशव्याही कचऱ्यात दिसत होत्या. त्यातून या पिशव्यांचे काय करता येईल याचा विचार सुरू झाला. प्लॅस्टिकच्या पिशव्या, वेफर्सची पाकिटे, बिस्किटांचे पुडे यांसह सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून कापडाची निर्मिती करून त्याच्या पर्सेस तयार करण्याचा प्रकल्प ऑगस्ट २०१५ मध्ये उभा राहिला.

दादरा-नगर हवेली येथील आदिवासी भागातही काम सुरू होते. या भागातील रोजगाराची गरज आणि तेथील नागरिकांच्या अंगी असलेले कौशल्य यांचा मेळ साधून प्लॅस्टिकचे धागे काढून ते विणण्याचे काम तेथील आदिवासी भागात सुरू करण्यात आले. पुण्यातील कचरावेचकांकडून प्लॅस्टिकच्या पिशव्या अधिक किंमत देऊन विकत घ्यायच्या, त्या स्वच्छ करून चरखा आणि हातमागाचा वापर करून दादरा येथे कापड विणायचे. त्यानंतर पुण्यातील कारागिरांकडून त्या कापडाच्या पर्स, टॅबलेट कव्हर, टेबल मॅट अशा गोष्टींची निर्मिती करायची असे मॉडेल उभे राहिले. या प्रकल्पात कोणतेही अधिकचे भांडवल न गुंतवता उत्पादनांच्या विक्रीतून मिळणारेच पैसे पुन्हा गुंतवायचे असे चक्र सुरू झाले. त्याच्या जोडीला शाळांमधून सुका आणि ओला कचरा वेगळा करण्यासाठी जागृतीचे कामही सुरू आहे.

दादरा नगर हवेली येथील तरुणांना खूप कमी संधी आहेत. त्यामुळे कापड तयार करण्याचे काम तेथे सुरू केले. त्याचवेळी पुण्यातील कचरावेचकांनी वेगळा केलेला कचरा विकत घेण्यात येतो. मात्र यासाठी स्वच्छ पिशव्या आवश्यक असतात. मात्र ओला आणि सुका कचरा एकत्र टाकला जातो. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून ओला कचरा टाकला जातो. अशा पिशव्यांचे काहीच करता येत नाही. त्यांचे विघटनही होत नाही. कचरा वेगळा टाकणे, ओल्या कचऱ्याचे परिसरातच विघटन करणे याबाबत जागृती करण्यात येत आहे. 

– अमिता देशपांडे-परांजपे, संस्थापक आरोहना इको-सोशल डेव्हलपमेंट