हिंदूू धर्मीयांसाठी प्रमाण असलेले वेद आणि पारशी लोकांचा धर्मग्रंथ असलेला अवेस्ता यामध्ये बरेच साम्य आहे. वेदांमध्ये सांगितलेले धार्मिक आचरण, यज्ञ, देवतांची स्तोत्रे, पूजाविधी हा भाग अवेस्तामध्येही आढळतो. हे ध्यानात घेऊन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे अवेस्ता धर्मग्रंथ आणि अवेस्तन भाषाविषयक दहा दिवसांचा अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या भांडारकर संस्थेच्या इतिहासामध्ये प्रथमच अशा पद्धतीचा अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे. लंडन विद्यापीठाच्या सहकार्याने ६ ते १७ जुलै या कालावधीत हा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. भांडारकर संस्थेमध्ये ६ जुलै रोजी सकाळी दहा वाजता या अभ्यासक्रमाचे उद्घाटन होणार असून लंडन विद्यापीठातील अवेस्ताच्या अभ्यासक प्रा. अल्मूट िहत्झे या मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर, भूपाल पटवर्धन, श्रीनिवास कुलकर्णी आणि संजय पवार या वेळी उपस्थित होते.
संस्थेच्या ध्येयधोरणांमध्ये इंडो-इराणीयन संस्कृतीच्या अभ्यासाचाही अंतर्भाव आहे. पारशी धर्मीयांच्या अवेस्ता भाषेविषयी माहिती करून देण्यासाठी आणि त्यातील संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशातून हा अभ्यासक्रम होत आहे. या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत पुण्यासह दिल्ली, अहमदाबाद या शहरातील आणि परदेशातील ६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी दिली. विनाशुल्क असलेल्या या अभ्यासक्रमासाठी पुण्यातील अभ्यासकांनाही प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून इच्छुकांनी २५६६१३६३ किंवा ९२७२२९६५५६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अवेस्तन हस्तलिखितांचे प्रदर्शन
भांडारकर संस्थेच्या ९८ व्या वर्धापनदिनानिमित्त ६ जुलै रोजी अवेस्तन भाषा अभ्यासक्रमाबरोबरच अवेस्ता भाषेतील दुर्मिळ हस्तलिखितांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. संस्थेच्या संग्रहामध्ये असलेली अवेस्ता भाषेतील ही हस्तलिखिते सर्वसामान्यांना पाहता यावीत या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे भूपाल पटवर्धन यांनी सांगितले.