वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नसल्याने ग्रामस्थ त्रस्त

शहराचा प्रथम नागरिक म्हणून प्रत्येक प्रभागातील नागरी प्रश्नांची सोडवणूक करू पाहणाऱ्या महापौरांचे त्यांच्याच प्रभागातील वैद्यकीय सेवेची दाणादाण उडाली, याकडे दुर्लक्ष झाले आहे. वैद्यकीय अधिकारी नाहीत, परिचारिका नाहीत म्हणून चऱ्होलीतील ग्रामस्थांची हेळसांड होत आहे. तथापि, त्याकडे महापौरांसह वैद्यकीय विभागाचेही दुर्लक्ष आहे.

पिंपरी पालिकेत ११ सप्टेंबर १९९७ मध्ये हद्दीलगतची गावे समाविष्ट झाली असून, त्यामध्ये चऱ्होली हे महत्त्वाचे गाव आहे. महापौर नितीन काळजे मूळचे चऱ्होलीचे रहिवासी आहेत. नव्या रचनेतील मोशी-चऱ्होली प्रभागातून ते निवडून आले आहेत. पूर्वी ते राष्ट्रवादीत होते, आता भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या कृपादृष्टीने ते महापौरपदी विराजमान झाले. चऱ्होलीत पालिकेने दवाखाना सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तेथे वैद्यकीय अधिकारी नाही आणि परिचारिकाही नाहीत, अशी परिस्थिती आहे. नेमणूक होऊनही वैद्यकीय अधिकारी तेथे रुजू झालेला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. रुग्ण येऊन बसतात आणि उपचारांविनाच त्यांना परत जावे लागत आहे. रुग्णालयाची अवस्था वाईट आहे. सर्वत्र अस्ताव्यस्त कचरा पसरलेला आहे. औषधे, इंजेक्शन ठेवण्याच्या जागांवर धुळीचे साम्राज्य  औषधांचा प्रचंड तुटवडय़ाच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहे.

महापौर या नात्याने संपूर्ण शहराची जबाबदारी आहे, त्यामुळे गावात पूर्ण वेळ देता येत नाही. दवाखाना रस्त्यावर असल्याने आतमध्ये धूळ साचते. रुग्णालय स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच पूर्णवेळ अधिकारी रुजू होईल.

नितीन काळजे, महापौर, पिंपरी-चिंचवड

महापौरांच्या प्रभागात नियुक्ती झालेले डॉक्टर अद्याप रुजू झालेले नाहीत. नागरिकांना औषधाचा तुटवडा नाही. येथील गैरसोयीबाबत दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

डॉ. अनिल रॉय, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी