कारागृहातून होणाऱ्या कैद्यांच्या पलायनाच्या घटना रोखण्यासाठी येरवडा कारागृहात आता प्रशिक्षित श्वान गस्त घालणार आहेत. कारागृह प्रशासनाने गृहखात्याकडे यासंदर्भातील प्रस्ताव नुकताच पाठविला असून हा प्रस्ताव मंजूर होण्याच्या मार्गावर आहे.
गेल्या वर्षी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातून गुंड टोळ्यांमधील काही सराईत गुंड पसार झाल्याची घटना घडली होती. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली होती. त्या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने नागपूर कारागृहातील बराकींची झाडाझडती घेतली, तेव्हा काही कैद्यांकडे मोबाईल संच सापडले होते. कारागृह विभागाच्या प्रमुखपदी अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी कारागृहातील सुरक्षाव्यवस्था बळकट करण्याचा निर्णय घेतला. न्यायालयीन कामकाजासाठी बाहेर पडणारे कैदी कारागृहात परतताना अमली पदार्थ, मोबाईल संच, तीक्ष्ण शस्त्रे दडवून आत प्रवेश करतात. हे प्रकार लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने येरवडा कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारात धातूशोधक यंत्र (मेटल डिटेक्टर ) बसविण्याचा निर्णय घेतला. तसेच कारागृहातील रक्षकांना छोटी धातूशोधक यंत्रे (हॅण्ड मेटल डिटेक्टर) दिली.
नागपूर येथील कारागृहातून कैद्यांचे पलायन झाल्यानंतर कारागृह प्रशासनाने अशा घटना रोखण्यासाठी अनेकविध उपाययोजना केल्या. सुरक्षाव्यवस्था आणखी सक्षम करण्याचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून येरवडा कारागृहात प्रशिक्षित श्वान आणण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. कारागृहात दोन प्रशिक्षित श्वान देण्यात यावेत, असा प्रस्ताव नुकताच शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर फक्त येरवडा कारागृहात श्वान गस्त घालणार आहेत. त्यानंतर राज्यातील उर्वरित कारागृहांत श्वानांमार्फत गस्त घालण्याचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ.उपाध्याय यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
देशातील सर्वात मोठे कारागृह हे दिल्लीतील तिहार येथे आहे. त्या खालोखाल सर्वात मोठे कारागृह म्हणून येरवडा कारागृहाचा क्र मांक लागतो. सध्या येरवडा कारागृहात  शिक्षा झालेले आणि न्यायाधीन बंदी असे एकूण चार हजार बंदी कारागृहात आहेत. क्षमतेपेक्षा जास्त बंदी येरवडा कारागृहात आहेत. त्यामुळे सुरक्षाविषयक उपाययोजना सक्षम करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.

इस्त्राईलच्या धर्तीवर श्वानांची गस्त
कैद्यांचे पलायन रोखण्यासाठी परदेशात कारागृहात रात्री प्रशिक्षित श्वान गस्त घालतात. इस्त्राईलच्या धर्तीवर येरवडा कारागृहात रात्री श्वान गस्त घालणार आहेत. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर दोन श्वान कारागृहात गस्त घालणार आहेत. डॉबरमन, लेब्रॉडोर जातीचे श्वान हे गस्तीसाठी उपयुक्त ठरतील. सुरुवातीला श्वानांची पिल्ले कारागृहात आणण्यात येतील. त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. श्वानांची घाणेंद्रियं तीव्र असतात. त्यामुळे येरवडा कारागृहातील गस्त घालण्यासाठी दोन श्वान पुरेसे आहेत, असे कारागृह विभागाचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले.

येरवडा कारागृहाची सुरक्षाव्यवस्था दृष्टिक्षेपात
– शंभर सीसीटीव्ही कॅमरे
– मोबाईल जॅमर
– कारागृह रक्षकांची गस्त
– प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्र