पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे फर्मान

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दोन ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करायची असल्याने आपापल्या कार्यक्षेत्रातील गावे आणि शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव वाढविण्यात आला आहे. तशीच परिस्थिती पिंपरी-चिंचवडमध्येही आहे. महापालिका क्षेत्रात उघडय़ावर शौचास बसणाऱ्या नागरिकांना दंडात्मक किंवा फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल आणि या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे फर्मानच पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बजावले असून सध्या ‘डू ऑर डाय’ प्रमाणे परिस्थिती असल्याचे सांगत हा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

दोन ऑक्टोबपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शहर हागणदारीमुक्त झाल्याचे चित्र निर्माण करायचे आहे, त्या दृष्टीने महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. राज्यशासनाचे तपासणी पथक यापूर्वी दोन वेळा शहरात येऊन गेले, तेव्हा त्यांना रस्त्यावर शौच करणारे नागरिक आढळून आले होते. नेहरूनगर परिसरातील पालिकेच्या पाच मजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर नैसर्गिक विधी केल्याचे या पथकाला दिसून आले होते. येत्या २७ आणि २८ सप्टेंबरला राज्य शासनाचे हे पथक पुन्हा येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मागील वेळेची पुनरावृत्ती होऊ नये, या वेळी तरी हे शहर हागणदारीमुक्त शहर म्हणून घोषित व्हावे, यासाठी आयुक्तांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. याबाबतच त्यांनी जनतेला तसेच शहरातील नागरिकांना केलेले आवाहन समाजमाध्यमावर प्रसारित झाले आहे. त्यामध्ये आयुक्तांनी महापालिकेची भूमिका स्पष्ट केली आहे.

आतापर्यंत दोन वेळा स्वच्छता तपासणी पथक आले, दोन्ही वेळी उघडय़ावर शौच करणारे नागरिक आढळून आल्याने आपण नापास झालो. ही बाब आता खपवून घेतली जाणार नाही. वॉर्डस्तरीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी याबाबतीत खबरदारी घेतली पाहिजे. येत्या पाच दिवसांसाठी डोळ्यात तेल घालून पाळत ठेवली पाहिजे. कोणीही नागरिक उघडय़ावर शौचाला बसता कामा नये. सकाळी पाच वाजल्यापासून आपल्याला पाळत ठेवायची आहे. ज्या ठिकाणी नागरिक हमखास उघडय़ावर शौचाला बसतात, तेथे अधिक लक्ष द्यावे. नागरिकांना पर्यायी जागा तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांकडे पाठवणे गरजेचे आहे.  जे नागरिक उघडय़ावर शौचाला बसतील, त्यांना दंड करण्यात येईल, वेळप्रसंगी त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. उघडय़ावर शौचाला बसणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे, त्या दृष्टीने जनजागृती व वातावरणनिर्मिती करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने तत्पर असले पाहिजे. या मोहिमेत लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यायचे आहे. पालिका अधिकाऱ्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून नागरिकांना सूचना तसेच चेतावणी देणे गरजेचे आहे. महिला बचत गटांचे सहकार्य घेतले जाणार आहे. ‘डू ऑर डाय’ प्रमाणे परिस्थिती असल्याने हागणदारीमुक्त शहर न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी लागेल, असा इशारा आयुक्तांनी यानिमित्ताने दिला आहे.