पिंपरी पालिकेतील पदोन्नतीचे अनेक विषय रखडले असताना मयत झालेल्या एका मजुराला मुकादम पदावर बढती देण्याची अजब ‘कामगिरी’ प्रशासनाने बजावली आहे. या गोंधळामुळे पालिकेच्या दोन विभागातील समन्वयाचा अभाव उघड झाला. त्या मजुराच्या कुटुंबीयांना नाहक मनस्तापही सहन करावा लागला.
ज्योतीबा पवार असे या मजुराचे नाव आहे. क्रीडा विभागात कार्यरत असताना तीन जूनला त्यांचे निधन झाले. त्या विषयीची माहिती पालिका प्रशासनाला मिळाली नाही. मजूर म्हणून काम करणाऱ्या जवळपास ५० चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली, त्यामध्ये पवार यांचा समावेश होता. मयत मजुराला पदोन्नती दिल्याच्या प्रकाराची माहिती उघड झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली.
या संदर्भात, प्रशासन अधिकारी डॉ. महेश डोईफोडे यांनी हा प्रकार घडल्याचे मान्य केले. मात्र, त्यात प्रशासनाची कोणतीही चूक नसल्याचा दावा केला. संबंधित व्यक्तीचे तीन जूनला निधन झाले. मात्र, याबाबतची माहिती क्रीडा विभागाने २९ जुलैला प्रशासनाला कळवली. तोपर्यंत पदोन्नती समितीची बैठक झाली होती आणि त्यामध्ये पवारांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यांच्या नातेवाईकाने ही माहिती पालिकेला कळवणे आवश्यक होते. तसे झाले असते तर हा प्रकार झालाच नसता, असे त्यांनी सांगितले.