ऐन निवडणुकीच्या आधी कार्यकर्त्यांचे ‘आउटगोइंग’ झाल्यामुळे आम्हाला फटका बसला असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. भारतीय जनता पक्षातील नेते आमच्या कार्यकर्त्यांना खेचण्यात यशस्वी झाले त्यामुळेच राष्ट्रवादीचा पिंपरी-चिंचवडमध्ये पराभव झाला असल्याचे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना  मांडले. भारतीय जनता पार्टीने पिंपरी-चिंचवडवर मिळवलेल्या विजयाने भारतीय जनता पक्षात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. १२२ जणांची उमेदवार संख्या असलेल्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व मिळवले आहे. या विजयामुळे भाजपच्या गटात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाने जी रणनीती आखली होती. त्यामुळेच आपल्याला हे यश मिळाले आहे अशी भावना नेत्यांमध्ये आहे. भारतीय जनता पक्षाला १२२ पैकी ७८ ठिकाणी विजयी होऊन भाजपने प्रथमच पिंपरी चिंचवड महानगर पालिकेवर आपला ताबा मिळवला आहे.

पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या गटात विशेष जल्लोष पाहायला मिळाला. आपण या यशाचे श्रेय कार्यकर्ते आणि जनतेला देत आहोत असे ते म्हणाले. आम्ही केलेल्या कामांना जनतेनी दिलेली ही पावती आहे असे ते म्हणाले. ज्यावेळी जगताप यांनी शहराध्यक्षपदाची धुरा जेव्हा सांभाळली होती त्याच वेळी त्यांनी आपण राष्ट्रवादीला पुढील निवडणुकीत पराभूत करू असा निर्धार केला होता. राष्ट्रवादीविरोधात दंड थोपटून त्यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिले होते. पिंपळे-गुरव हा लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला समजला जातो. या भागात तर त्यांनी आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले आहे. भविष्यात भारतीय जनता पक्ष जोमाने काम करुन आपली योग्यता सिद्ध करण्यात यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचा पराभव ही मोठी घटना मानली जात आहे. अनेक कामे करुन पायाभूत सुविधांचा विकास करुन देखील आपण येथे निवडणूक का हरलात असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. आमचा पराभव का झाला याचे आम्ही पूर्ण विश्लेषण करू असे त्या म्हणाल्या. या पराभवाची कारणे आम्ही शोधणार आहोत असे त्या म्हणाल्या. निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आपल्याकडे खेचले होते. ऐन निवडणुकीच्या आधी मोठ्या नेत्यांचे ‘आउटगोइंग’ झाल्यामुळे आम्हाला फटका बसला असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.