* ‘महापौरपदाची निवडणूक लढवण्यात अर्थ नाही’
* ‘संपर्कक्षेत्रात’ परतलेल्या अजित पवारांकडून पराभवाचे ‘चिंतन’

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दारूण पराभवानंतर ‘नॉट रिचेबल’ असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी ‘संपर्कक्षेत्रात’ परतले. पिंपरी बालेकिल्ल्यातील पराभवाचे चिंतन करत निवडणुकीत नेमके काय घडले, याचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला. शहराचा कायापालट केला असतानाही विकासाचा मुद्दा मतदारांनी नाकारला, इतक्या मोठय़ा प्रमाणात पक्षाचे उमेदवार पराभूत झाले, याची तीव्र नाराजी पवारांना लपवता आली नाही. भाजपला मिळालेले निर्विवाद बहुमत पाहता महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक लढवण्यात अर्थ नसल्याचे मतही त्यांनी बैठकीत मांडले.

पुण्यात बारामती गेस्ट हाऊस येथे अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते. पराभवाने खचून जाऊ नका, नाउमेद होऊ नका, सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडा, आपण पुन्हा उभारी घेऊ, अशा आशावाद व्यक्त करत थोडय़ा-थोडय़ा मतांनी अनेक उमेदवार पराभूत झाले, याविषयी त्यांनी हळहळ व्यक्त केली. गेल्या १५ वर्षांत शहरात मोठय़ा प्रमाणात विकासकामे होऊनही मतदारांनी विकासाचा मुद्दा नाकारला. शिवसेना, काँग्रेसचे उमेदवार अपेक्षेप्रमाणे चालले नाहीत, त्याचा फायदा भाजपला झाल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. महापौरपदाच्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊनही काही उपयोग होणार नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यात काही अर्थ नाही, उगीचच हसू होईल, असे मत पवारांनी व्यक्त केले. मुलाला निवडून आणले, बाकीचे उमेदवार वाऱ्यावर सोडले, अशी सूचक टिप्पणी त्यांनी बैठकीत केली.

विरोधी पक्षनेतेपदी कोण?

पालिकेत दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ राष्ट्रवादीचे आहे. विरोधी पक्ष म्हणून आक्रमकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करत राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपदासाठी चाचपणी केली. योगेश बहल, मंगला कदम, दत्ता साने, अजित गव्हाणे, नाना काटे, उषा वाघेरे अशी ज्येष्ठ नगरसेवकांची नावे चर्चेत आहेत. पुढील बैठकीत निर्णय होईल, असे सांगण्यात आले.