पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक आणि राडा झाल्याचे पाहायला मिळाले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात रेकॉर्डिंग सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाचे संभाव्य उमेदवार व माजी महापौर योगेश बहल आणि भाजपचे संभाव्य उमेदवार आणि माजी नगरसेवक यशवंत भोसले यांच्यात वादावादी झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर भर कार्यक्रमातच आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.  या प्रकरणी यशवंत भोसले यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आपल्याला धमकावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी वृत्तवाहिनीच्या निवडणूकविषयक कार्यक्रमासाठी पिंपरीतील संत तुकारामनगरमधील अब्दुल कलाम उद्यानामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवेदकाने प्रश्न विचारल्यानंतर पिंपरी-चिंचवड पालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा यशवंत भोसले यांनी उपस्थित केला. त्यानंतर वादवादीला सुरुवात झाली. यावेळी योगेश बहल आणि यशवंत भोसले यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर भर कार्यक्रमात राडा झाला. या घटनेनंतर यशवंत भोसले यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात जाऊन योगेश बहल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. आपल्याला धमकावण्यात आल्याचा आरोप यशवंत भोसले यांनी तक्रारीमध्ये केला आहे.

यशवंत भोसले यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पोलिसांनी अशा प्रकारचे कार्यक्रम प्रसारमाध्यमांनी आयोजित करताना पोलीस सुरक्षा घ्यावी, अशी सूचना केली आहे. दरम्यान, पुढील महिन्यात होत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधील वादावादी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज घडलेल्या प्रकारानंतर भाजपने पत्रकार परिषदही बोलावली आहे.