पिंपरी महापालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदारांचा प्रतिसाद वाढला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात तब्बल ११ टक्के वाढ झाली आहे. वाढलेल्या या मतदानाचा नेमका फायदा कोणाला आणि फटका बसलाच तर तो कोणाला बसणार, याविषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.

पिंपरी पालिकेच्या १२७ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. उपलब्ध आकडेवारीनुसार, एकूण ६५. ३५ टक्के मतदान झाले. यापूर्वी, २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ५५.९५ टक्के व त्यानंतर, २०१२ च्या निवडणुकीत ५४.६८ टक्के इतके मतदान झाले होते. गेल्या दोन्ही निवडणुकीच्या तुलनेत यंदाचे मतदान वाढले आहे. २०१२ च्या तुलनेत ही वाढ ११ टक्के आहे. मोशी-चऱ्होली, भोसरी- चक्रपाणी वसाहत, वाकड-पुनावळे प्रभागात ७० टक्क्य़ाहून अधिक मतदान झाले आहे. तर, २३ प्रभागांमध्ये ६० टक्क्य़ांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीत सत्तेसाठी रस्सीखेच आहे. सोसायटय़ांचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी वाढलेले मतदान आमच्या पथ्यावर पडेल, असे गणित भाजप नेत्यांकडून सांगितले जाते. तर, झोपडपट्टय़ांमध्ये वाढलेले मतदान आमच्या फायद्याचे राहील, असे समीकरण राष्ट्रवादीकडून सांगितले जाते. गुरूवारी (२३ फेब्रुवारी) मतमोजणी झाल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.