मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीत केलेल्या टीकेला शहर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. पवार यांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने त्यांचे ताळतंत्र सुटले आहे, त्यामुळे ते काहीही बरळू लागले आहेत, अशी टीका खासदार अमर साबळे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली. ‘परमेश्वर, अजित पवारांना सुबुद्धी देवो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस भारती चव्हाण यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यात आला. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे यांनी पक्षात त्यांचे स्वागत केले. या वेळी माजी महापौर आझम पानसरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे आदी उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

साबळे म्हणाले,की पक्षात नवा-जुना असा कोणताही वाद नाही. जगताप यांच्या नेतृत्वाखाली पालिका निवडणुकाजिंकू. शहराध्यक्ष जगताप म्हणाले की, राष्ट्रवादीने आमच्यावर केलेले आरोप सिद्ध करावेत. जनता योग्य वेळी कृतीतून उत्तर देईन. राष्ट्रवादीचा जाहीरनामा ‘कट-पेस्ट’ स्वरूपाचा आहे. गेल्या जाहीरनाम्यातील ९० टक्के गोष्टी नव्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.