विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची टीका

भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष जनतेला मूर्ख बनविण्याचे काम करीत आहेत, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आकुर्डीत केली. भाजप सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरभरात मुंडे यांच्या विविध सात सभांचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा ते आकुर्डीत बोलत होते. यावेळी जगदीश शेट्टी, प्रसाद शेट्टी, नीलेश पांढारकर, इक्बाल शेख आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, भाजपने भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्तीचा नारा दिला आहे. परंतु त्यांच्याच पक्षात गुंडांचा भरणा सुरू आहे. काशीला जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेले तरी पवित्र होता येते, असे आता सांगितले जाते. केंद्र आणि राज्य सरकारकडून पिंपरी पालिकेला पारितोषिके दिली जातात. जर चुकीचे काम झाले असेल तर ही पारितोषिके मिळाली नसती. पिंपरी पालिका देशात अग्रस्थानी आहे. नागपूर पालिकेचे नावही कोणाला माहिती नाही. मग, कोणत्या तोंडाने ते राष्ट्रवादीवर आरोप करतात.

भाजप सरकारने महापालिकेला किती मदत केली याचा हिशोब द्यावा. याउलट, शहराची उद्योगनगरी ही ओळख पुसण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत. शहरातील उद्योग इतर ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. काही उद्योग बंद होत आहेत. हेच ‘अच्छे दिन’ आहेत का, खोटय़ा प्रचाराला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या आणि पिंपरी पालिकेची सत्ता पुन्हा राष्ट्रवादीकडे सोपवा, असे आवाहनही मुंडे यांनी केले.

राष्ट्रवादीकडून फक्त ‘बिल्डर लॉबीचे’ कल्याण : राधाकृष्ण विखे
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या अस्तित्वासाठी झटते आहे. कुठेही घोटाळा झाला तरी लोक राष्ट्रवादीचे नाव घेतात, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी चिंचवड येथे बोलताना केली. पिंपरी-चिंचवडचा विकास केल्याचा दावा राष्ट्रवादी करत असली, तरी त्यांनी केवळ ‘बिल्डर लॉबीचे कल्याण करण्यापलीकडे काहीच केले नाही, असेही ते म्हणाले.पिंपरी पालिका निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात आलेले विखे म्हणाले, की १५ वर्षे सत्तेत असतानाही शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित का करण्यात आली नाहीत. उद्या बांधकामांवर कारवाईचा बडगा पडलाच, तर त्याचे पाप कोण माथी घेणार आहे. भाजप-शिवसेनेची सध्या बनवाबनवी सुरू आहे. त्यांची भांडणे ही नळावरच्या भांडणासारखी आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांची औकात काढत आहेत.
मात्र, जनताच त्यांची औकात दाखवून देणार आहे. पिंपरी-चिंचवडला नवा विचार देण्यासाठी काँग्रेसला संधी देण्याचे आवाहन विखे पाटील यांनी या वेळी केले.