गिरीश बापट यांची टीका; भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा इशारा सत्ता असूनही कामे न केल्यामुळेच निष्क्रिय ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी नाकारले, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत बोलताना केली. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराची निश्चितपणे चौकशी होणार असून ज्यांनी-ज्यांनी पैसे खाल्ले त्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पिंपरी पालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडून भाजपकडे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बापट यांच्यासमवेत आनंदोत्सव साजरा केला. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे, अॅड. सचिन पटवर्धन, उमा खापरे, एकनाथ पवार, प्रमोद निसळ, सदााशिव खाडे आदी उपस्थित होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी एकजुटीने, परिश्रमपूर्वक तसेच नियोजनबद्ध काम केल्यामुळेच पिंपरी पालिकेत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याचे सांगून बापट म्हणाले, सामान्य जनतेने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवू. ‘मेट्रो’साठी ९५० कोटी रुपये मंजूर झाले असून ती निगडीपर्यंत नेण्यात येईल. पुढील निवडणुकीपयंत मेट्रो सुरू झालेली असेल. पुण्याच्या विमानतळाचा लवकरच विस्तार होणार असून सासवडला नव्याने विमानतळ होत आहे. संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून संरक्षण खात्याशी संबंधित प्रश्न आता मार्गी लागणार आहेत. पीएमपीसाठी नव्या गाडय़ा घेणे, दौंड-लोणावळा विस्तारीकरण, मोठय़ा रस्त्यांचे रुंदीकरण, आवश्यकतेप्रमाणे पुलांची उभारणी करण्यासह जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे कालबद्ध विकासाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. सामान्यांना केंद्रस्थानी ठेवून शहरात भरीव सुधारणा करू, अशी ग्वाही देतानाच स्थानिक पातळीवरील निर्णय शहरपातळीवर होतील आणि धोरणात्मक निर्णय राज्य सरकारच्या पातळीवर होईल, असे बापट यांनी स्पष्ट केले.