पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक २१ मधील भाजपचे उमेदवार धनराज आसवानी आणि त्यांच्या मुलाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे.  या मारहाणीमध्ये धनराज आसवानी आणि त्यांचा मुलगा दोघेही जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. वादाचे कारण अद्याप स्पष्टपणे समजू शकलेले नाही. मात्र उत्साहात सुरु झालेल्या मतदान प्रक्रियेला या घटनेमुळे गालबोट लागले आहे. पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मधील या  घटनेप्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये भाजपचे दोन तर राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या घटनेशिवाय प्रभाग क्रमांक ९ मध्येही भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची पाहायला मिळाले. पोलिसांनी मतदान केंद्रावर एका महिलेला गाडी घेऊन जाण्यापासून रोखल्याच्या शुल्लक कारणावरुन दोन गटामधील वादाला सुरुवात झाल्याचे समजते. महिला नक्की कोणत्या गटातील होती हे स्पष्ट झालेले नाही, मात्र  यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल भोसले यांचे वडील हणमंत भोसले यांना भाजपा उमेदवार राजेश पिल्ले मारण्यासाठी आले होते. यावेळी भोसलेंच्या कार्यकर्त्यांनी पिल्ले यांना मारहाण केल्याचे समजते. स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी तीन तलवारी आणि एक कोयता अशी हत्यारे मिळाली आहेत.

वाचा: पुणेकरांचा कौल कोणाला ?

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर कुणाची येणार सत्ता?

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. सकाळी ७ पासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत पहिल्या दोन तासात ७.00 टक्के मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. तर सकाळी ११. ३० वाजता हा आकडा २०.७३ पोहचला होता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मतदानाच्या टक्केवारीचा आकडा वाढताना दिसला.  दुपारी १.३० वाजेपर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये ३०.८६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. दुपारी ३.३० पर्यंत ४ प्रभागात मिळून एकूण ४३.८० टक्के मतदान झाले होते. शेवटची आकडेवारी अद्याप हाती आली नसून प्रशासकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक अंजाजानुसार, ६५ ते ७० टक्के मतदानाची नोंद अपेक्षित आहे.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यंदाच्या मतदानाच्या दिवशी  पहिल्यांदाच उमेदवारांच्या शिक्षणापासून ते त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांपर्यंतची सर्व बित्तम बातमी देणारे फलक मतदार केंद्राबाहेर लावण्यात आले होते. मतदारांना मत देण्यापूर्वी उमेदवारांची माहिती दर्शक फलक  काढून टाकल्याची घटना देखील मतदानाच्या दरम्यान पुढे आली होती. पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग क्रमाक २५ मधील वाकडमधील भूमकर चौकामधील उमेदवारांची माहिती दर्शविणारे फलक काढून टाकण्यात आल्याचे  समोर आले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभारी ठरविण्यासाठी मतदार उत्साहाने मतदान केंद्रावर येताना दिसले. पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी १२७ जागांसाठी ७७३ उमेदवार रिंगणात आहेत. पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे तसेच भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील प्राधिकरण परिसरात मतदान केले.

नेतेमंडळी तसेच तरुणाईंसोबत ज्येष्ठ नागरिकांमध्ये देखील मतदानासाठी उत्साह दिसत आहे. दरम्यान या परिसरातील बरेच नागरिक हिंजवडीतील आयटीकंपनीमध्ये कार्यरत आहेत. मंगळवारी मतदानाच्या दिवशी देखील कंपनीचे कामकाज सुरु राहणार आहे. मात्र कंपनीतील कर्मचाऱ्यांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी आयटी कंपनीने कर्मचाऱ्यांना दोन तासांची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. २००२ पासून पिंपरी पालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे ही निवडणूक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लावणारी अशीच आहे. तर बदलत्या व पोषक वातावरणामुळे पालिकेची सत्ता खेचून आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीच्या राजकारणात वैयक्तिक लक्ष घातल्याचे दिसून आले होते. पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना प्रथमच भाजपविना स्वबळावर मैदानात उतरत असून शिवसेना या ठिकाणी कशी सुरुवात करणार हे पाहणे देखील औत्सुकतेचे ठरणार आहे.  मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी लावलेली हजेरी ही या ठिकाणी या तीन पक्षांतच मुख्यत्वे सत्तेचा सामना रंगणार असल्याचे दिसते. या निवडूकीमध्ये राष्ट्रवादी हॅट्रीक साधणार की, जनता परिवर्तनावर विश्वास ठेवणार याचा निकाल  २३ फेब्रुवारीला लागणार आहे.

Live Updates

०६.००: प्रशासकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अदांजे ६५ ते ७० टक्के मतदान झाल्याचा अंदाज

०५.३०: मतदारांच्या वाढत्या आलेखाने मतदान संपले, पिंपरी- चिंचवड नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जागृकता दिसून आली

०५.१०: भाजप उमेदवार धनराज आसवांनी आणि त्यांचा मुलगा जख्मी आहे. या दोघाना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मारहाण झाल्याची पोलिसांची माहिती

०५.००:  मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजपा-राष्ट्रवादी भिडले. तणावाचे वातावरण. पोलीस घटनास्थळी

०४.३०:  पिंपरी चिंचवडमध्ये  ७.३० ते ३.३० दरम्यान ४३.८० टक्के मतदानाची नोंद झाली.

police

०४.००: संवेदनशील प्रभागांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.

०३.४५: मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी रिक्षावाल्याने घेतला पुढाकार

मतदारांसाठी मोफत रिक्षा सेवा
मतदारांसाठी मोफत रिक्षा सेवा

०३.३३:  पिंपरी चिंचवड मधील मोशी येथे शिवकुमार बायस या अवलीयाने मतदानाचा टक्का वाढवा यासाठी आपली रिक्षा मतदारराजा च्या घरापासून ते मतदान केंद्र पर्यंत मोफत ठेवली आहे.

०३.३३:  राज्यातील  दहा महापालिकांच्या  निवडणुकींमध्ये दुपारी १.३० वाजेपर्यंत सरासरी ३१.०१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

०३.०७: प्रभाग क्रमांक ५ मध्ये असणाऱ्या  संत तुकारामनगर या ठिकाणचे मतदार केंद्र क्रमांक २० उंचावर असल्यामुळे या ठिकाणी मतदान करण्यास पोहोचणाऱ्या वयोवृद्धांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. संत तुकारामनगर शिवाय या प्रभागामध्ये  गवळीनगर, रामनगरी,ज्ञानेश्वरनगर, चक्रपाणी वसाहतीचा काही भागाचा समावेश होतो.

०३.0५: प्रभाग क्रमांक ५ मध्ये असणाऱ्या  संत तुकारामनगर या ठिकाणचे मतदार केंद्र क्रमांक २० उंचावर असल्यामुळे या ठिकाणी मतदान करण्यास पोहोचणाऱ्या वयोवृद्धांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.  

०२.४५: संवेदनशील प्रभागांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.  या प्रभागांसाठी खास बंदोबस्ताची आखणी करण्यात आल्याचे दिसते.

०२.४५: सोशल मीडियावर मतदार मतदानाचा हक्क बजावल्याचे सांगताना दिसत आहेत.

०२.३०: पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये  सकाळी ७.३०  ते दुपारी १.३० पर्यंत ३०.८६ टक्के मतदान झाले आहे.

०२.२२: प्रत्येक मतदाराला चारवेळा मतदान करावे लागत असल्यामुळे मतदान करताना फार वेळ लगत आहे.

०२.१५: पिंपरी येथील प्रभाग क्रमांक २१ मधील मतदान केंद्र क्रमांक ६२ मध्ये मतदान यंत्रणेमधील बिघाडामुळे मतदारांना ताटकळत उभारावे लागल्याचे पाहावाय मिळाले.

०२.००:  मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली असून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

०२.००: पिंपरी चिंचवडच नव्हे तर अशा स्वरुपाचे फलक पुण्यामध्ये देखील लावण्यात आले आहेत.

०१.४५: प्रभाग क्रमांक २५ मध्ये वाकडसह पुनावळे, ताथवडे, भूमकरवस्ती,  काळाखडक या वार्डांचा समावेश आहे.

वाकडमध्ये निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर
वाकडमध्ये निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर

०१.३०:  निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर ठेवत वाकडमधील प्रभाग क्रमांक २५ येथील उमेदवारांच्या गुन्हेगारी मालमत्तेची माहिती देणारे फलक काढून ठेवण्यात आले आहेत.

०१.१५:  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रेत्येत मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवारांची माहिती दर्शवणारे फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक अहर्ता, त्याच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे तपशील, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नमूद केली आहे.

०१.००: मतदान केंद्रावरील गर्दी वाढतच असून अखेरच्या दोन तासात टक्केवारीतील वाढही समाधानकारक असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

१२.४५: सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

१२.३५: पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी ११.३० पर्यंत २०.७३ टक्के मतदान झाले. अखेरच्या दोन तासात मतदानाची टक्केवारी तब्बल १३ टक्क्यांनी वाढली आहे.

pimpri-red-carpet

१२.१५: पिंपरीमधील मोरवाडी येथील प्रभाग क्रमांक १० मध्ये मतदार राजाच्या स्वागतासाठी चक्क रेड कार्पेट टाकण्यात आले आहे.

११.४५: पिंपरी- चिंचवड प्रभाग क्रमांक १ मध्ये- तळवडे आयटी पार्क, ज्योतिबानगर भाग, सोनवणेवस्ती, पाटीलनगर, चिखली गावठाण, गणेशनगर आणि मोरेवस्ती. या परिसराचा समावेश होतो.

११.३२: पिंपरी चिंचवड महापालिकेतील भोसरी येथील मतदान केंद्रावरील मशीन बिघाडाची घटना वगळता इतर सर्वत्र पहिल्या तीन तासामध्ये सुरळीत मतदान सुरु आहे.

११.२४:पहिल्या दोन तासांतील मतदानाच्या आकडीवारीनुसार, उस्मानाबाद महापालिका आणि पिंपरी चिंचवड यांच्यातील टक्केवारीमध्ये समानता असल्याचे दिसते.

११.१५: नागरिक मतदानासाठी बाहेर पडत असल्यामुळे हा आकड्यामध्ये अधिक सुधारणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

११.१०: मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत पहिल्या दोन तासामध्ये पिंपरी चिंचवडमधील मतदानाची टक्केवारी कमी असल्याचे दिसून येते.

१०.४५:  पिंपरी चिंचवड महापालिकेतील पिंपळे गुरव, परिसरातील गर्दी हळू हळू वाढताना दिसते.%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0

१०.३०:  पहिल्या दोन तासांमध्ये ७ टक्के मतदान झाल्यानंतर हा आकडा पुढील काळात अधिक वाढणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

१०.२०: भोसरीतील सावित्रीबाई फुले मतदान केंद्रावर मशीन बिघडल्यामुळे मतदारांचा खोळंबा, मतदानासाठी एक तास उशिर

१०.१५: पिंपरी- चिंचवड परिसरातील अनेक मतदार हिंजवडीमधील आयटी कंपन्यामध्ये कार्यरत आहेत.

१०.१५: हिंजवडीतील आय टी कंपन्यांना मतदानाच्या दिवशी सुट्टी नाही, मतदानासाठी दोन तासांचा ब्रेक देण्यात येणार आहे.

१०.०५: पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी ७.३० पासून  ९.३० वाजेपर्यंत ७ टक्के मतदान 

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

१०.००: मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने निगडी प्राधिकरण येथील सिधूनगर मतदान केंद्रात जाऊन  मतदानाचा हक्क बजावला.

९.४५: भाजपची विजयाची मदार आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर अवलंबून आहे.

९.३०: शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे व भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात महापालिका निवडणुकीत वर्चस्वाची लढाई आहे.

आमदार लक्ष्मण जगताप

९.१५: भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावला.

९.१५: पिंपरी चिंचवड महापालिकेतील १६०८ मतदान केंद्रापैकी ८८ मतदान केंद्र संवेदनशील आहेत.

९.१०: हळू हळू मतदानाच्या रांगा वाढताना दिसते.

८.५०: ज्येष्ठ नागरिकांनी आपला उत्साह अशा प्रकारे दाखवून दिला.%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8

८.४०: पिंपरी-चिंचवड मतदार संघात  ज्येष्ठ नागरिकांमध्ये देखील मतदानासाठी उत्साह दिसत आहे.

पिंपरी चिंचवड महापौर-शकुंतला धराडे

८.४०:पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

८.२५:पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव येथे सकाळ पासूनच मतदार राजाने मतदान करण्यासाठी गर्दी केली आहे.

८.१०:मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

८.०५:सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत मतदारांना ४९ रुपयांची सवलत दिली जाणार आहे.

८.००: मतदानाला जाण्यासाठी उबर टॅक्सी सेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना खास सवलत जाहीर करण्यात आली आहे.

७.५०: महापालिकेने विविध स्तरावर मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.

७.४५: पिंपरी-चिंचवड महापालिकेवर गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे.

७.४०:  अनुसुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासन देखील सज्ज

७.३५: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १ हजार ६०८ केंद्रावर मतदान होणार आहे.

७.३०:  राज्यभरात मतदानाला सुरुवात झाली आहे.

७.२५: सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरूवात होणार

७: १० : राज्यातील दहा महापालिकांसाठी आज मतदान