भोसरीतील बिनविरोध झालेली जागा वगळता पिंपरी पालिकेच्या १२७ जागांसाठी मंगळवारी (२१ फेब्रुवारी) सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे, त्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण ११ लाख ९२ हजार मतदारसंख्या असून निवडणूक रिंगणात असलेल्या ७७३ उमेदवारांचे भवितव्य ‘वोटिंग मशीन’मध्ये बंद होणार आहे.

पिंपरी पालिकेच्या ३२ प्रभागांच्या प्रत्येकी चार प्रमाणे १२८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये सर्वसाधारण गटातील जागा ७० (स्त्री-पुरुष) इतकी आहे.

अनुसूचित जातींसाठी २०, अनुसूचित जमातींसाठी तीन, ओबीसी ३५ असे साधारण आरक्षित जागांचे वर्गीकरण आहे. महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असल्याने एकूणातील ६४ जागांवर महिला लोकप्रतिनिधी निवडून येणार आहेत. भोसरीतील धावडे वस्ती प्रभागात भाजपचे रवी लांडगे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे मंगळवारी १२७ जागांसाठी मतदान होणार आहे, त्यासाठी ७७३ उमेदवार रिंगणात आहेत. पाच जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून प्रभागनिहाय मतदार याद्या करण्यात आल्या. त्याद्वारे १२ जानेवारीला प्रारूप मतदार यादी करण्यात आली. २१ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार, शहराची मतदारसंख्या ११ लाख ९२ हजार ०८९ इतकी झाली आहे. त्यामध्ये पुरुष – ६,४०,६९६, स्त्रिया – ५,५१,३६२ आणि तृतीयपंथी ३१ मतदारांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी एकूण १६०८ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून त्यामध्ये १५९ महापालिका शाळा, ३२४ खासगी इमारती, एक शासकीय तसेच दोन एमआयडीसीच्या इमारती अशा एकूण ४८६ इमारतींचा समावेश आहे. या सर्व मतदान केंद्रांसाठी ५०५३ बॅलेट युनिट आणि १७७२ कंट्रोल युनिटचा वापर करण्यात येणार आहे. २०, २१ आणि २३ फेब्रुवारीला दारूवाटप आणि विक्रीस बंदी करण्यात आली आहे. २३ फेब्रुवारी (गुरुवारी) मतदानमोजणी होणार आहे.

पाच लाख नागरिकांना ‘एसएमएस’

मोबाइल एसएमएसद्वारे पाच लाख नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. याशिवाय, झोपडपट्टय़ा, मॉल, सोसायटय़ा, भाजीमंडई, उद्याने, बसथांबे, कारखाने आदी ठिकाणी १३ लाख आवाहनपत्रके वाटप करण्यात आले. ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतील कलावंतांची १० मिनिटांची जनजागृती करणारी चित्रफीत करण्यात आली आहे. पथनाटय़े, पालक मेळावे, वक्तृत्व स्पर्धा, विविध स्पर्धा आदी माध्यमातून जनजागृती करण्याचा पुरेपूर प्रयत्न महापालिकेने केला आहे. ‘अ‍ॅनिमेशन फिल्म’द्वारे मतदान पद्धतीची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे