राष्ट्रवादी शहराध्यक्षांचा आरोप; अजित पवारांचे मौन

भारतीय जनता पक्षाने केंद्रातील व राज्यातील सत्तेचा दुरूपयोग करून पिंपरी महापालिकेची निवडणूकजिंकली आहे. पोलीस, प्रशासन व महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वत:ला फायदेशीर ठरेल, अशीच व्यूहरचना भाजपने केली होती, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे. दरम्यान, या पराभवासंदर्भात, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र अद्याप मौनच पाळले आहे.

महापालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी नेत्यांची चिंतन बैठक पक्ष कार्यालयात पार पडली. प्रभागनिहाय बैठका घेऊन पराभवाची नेमकी कारणे शोधून काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीत नवनिर्वाचित ३६ सदस्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केल्यानंतर वाघेरे म्हणाले की, मतदान यंत्राविषयी खूप तक्रारी पक्षाकडे आल्या आहेत.

अनेक उमेदवारांना त्यांच्या कुटुंबांमधील सदस्यांची मतेही मिळाली नाहीत. अपेक्षित नसणाऱ्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भातील तक्रारींची दखल घेतली पाहिजे. जुन्या पध्दतीने मतपत्रिकांवर शिक्के मारण्याची पद्धत पुन्हा सुरू करावी, यासाठी पाठपुरावा करणार आहे. १५ वर्षांंच्या सत्ताकाळात राष्ट्रवादीने शहराचा कायापालट केला. तरीही जनतेने राष्ट्रवादीच्या विरोधातील कौल दिला.

जनतेचा कौल मान्य करून सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, असे वाघेरे यांनी म्हटले आहे.