भाजपच्या गटबाजीचे दर्शन; खासदारांची हजेरी, आमदारांची दांडी

पिंपरी पालिकेतील बहुचर्चित स्वीकृत नगरसेवकपदाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी (१९ मे) अखेर शांततेत पार पडली. या निवडणुकीवरून भाजपमध्ये सुरू असलेल्या घडामोडी आणि धुसफूस पाहता काहीतरी गडबड होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, भाजपने जाहीर केलेले उमेदवार कायम राहिले व त्यांच्या निवडीवर सभेत शिक्कामोर्तबही झाले. खासदार अमर साबळे आवर्जून उपस्थित होते. तर, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांच्या अनुपस्थितीने पक्षातील गटबाजीचे दर्शन झाले.

महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी सभेचे कामकाज सुरू झाले. विषयपत्रिकेवर दहाव्या क्रमांकावर असलेला स्वीकृत नगरसेवकाचा विषय सुरुवातीलाच घेण्यात आला. भाजपचे केशव घोळवे यांची सूचना मांडली, त्यास हर्षल ढोरे यांनी अनुमोदन दिले. या निवडीसंदर्भात आक्षेप असणाऱ्यांनी न्यायालयात जावे, त्यासाठी सभागृहाचा वेळ वाया घालवू नये, अशी भूमिका घेत ही निवड जाहीर करण्याची मागणी भाजपचे गटनेते एकनाथ पवार तसेच राष्ट्रवादीचे गटनेते योगेश बहल यांनी केली. त्यानंतर, भाजपचे माउली थोरात, बाबू नायर, अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे तसेच राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर व संजय वाबळे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर, सभागृहात महापौर व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते नव्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी खासदार अमर साबळे, बहल, पवार, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले आदी उपस्थित होते. आयुक्त झाल्यानंतर प्रथमच सभेत आलेल्या श्रावण हर्डीकर यांचाही सत्कार करण्यात आला. सभेचे कामकाज संपल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला व नवनिर्वाचित सदस्यांसह मिरवणूकही काढली. या सभेसाठी पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहणार होते. मात्र, ते फिरकले नाहीत. खासदार साबळे यांनी आवर्जून हजेरी लावली. तर, ‘कारभारी’ जगताप व लांडगे गैरहजर होते. राष्ट्रवादीच्या गोटातही नाराजी होती. मात्र, त्याची जाहीर वाच्यता झाली नाही. भोईर व वाबळे समर्थक मोठय़ा संख्येने आले होते.