पिंपरी पालिकेच्या पोटनिवडणुकीनंतर शहरातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांच्यापाठोपाठ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही शहर दौरा झाला. संघटनात्मक फेरबदल झाल्यानंतर शिवसेनेत  ‘नवा गडी, नवे राज्य’ आले. दरम्यान, आजी-माजी शहराध्यक्षांची गटबाजी आणि गटनेतेपदावरून उद्भवलेल्या अंतर्गत वादात काँग्रेस अडकून पडली आहे.
सदस्यनोंदणी अभियानाअंतर्गत पंकजा मुंडे यांनी बुधवारी भोसरी, पिंपरी आणि रहाटणीत मेळावे घेतले आणि पालिकांवर भाजपचा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले. त्यांच्या दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमधील उत्साह दुणावला. गुरूवारी दिवसभर अजितदादा शहरात होते. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासह विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी पुढील व्यूहरचनाही केली. मंत्रीपदाचा व्याप नसल्याने शहरासाठी यापुढे पूर्णवेळ देणार असल्याचे सांगत ‘सत्ता राखण्यासाठी कायपण’ असे सूतोवाचही त्यांनी केले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने राहुल कलाटे यांच्याकडे नेतृत्वाची धुरा दिली. एकच शहरप्रमुख पद ठेवून शहर शिवसेना एका छत्राखाली आणण्यात आली व समन्वयाचे काम आमदार गौतम चाबुकस्वारांकडे सोपवण्यात आले. पालिकेवर झेंडा फडकावण्याचा निर्धार व्यक्त करून चाबुकस्वार व कलाटेंनी आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. या सगळ्या घडामोडीत गटनेतेपदावरून आजी-माजी शहराध्यक्षांच्या अंतर्गत वादात काँग्रेस गुरफटली आहे. निर्णायक चेंडू आता प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या कोर्टात आहे. एकापाठोपाठच्या या घडामोडींमुळे शहरातील राजकारण ढवळून निघाल्याचे दिसून येते.