वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक लिहिते झाल्यामुळे साहित्य हे केवळ मराठीच्या प्राध्यापकांपुरते मर्यादित न राहता प्रवाही झाले आहे, असे मत मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
ग्रंथाली प्रकाशनतर्फे लक्ष्मीकांत देशमुख यांच्या ‘मृगतृष्णा’ या कथासंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेत्री-लेखिका सुप्रिया विनोद यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात प्रा. जोशी यांनी पुस्तकाविषयी भाष्य केले. वेगवेगळ्या कथांमधून स्त्री-पुरुष नातेसंबंधांवर भाष्य करीत हे बंध उलगडण्याचा प्रयत्न लक्ष्मीकांत देशमुख यांनी या कथासंग्रहात उत्कटतेने केला आहे, असे मत सुप्रिया विनोद यांनी या वेळी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘‘पुरुष असूनही स्त्रीत्वाच्या विविध पैलूंवर एखाद्या लेखिकेपेक्षाही चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकला गेला आहे. स्त्री-पुरुष संबंध, प्रेमभंग, समलैंगिक संबंध, व्यभिचार या विषयांवर समाजात खुलेपणाने चर्चा होत नाही. त्यामुळे हे विषय कथेतून मांडण्याचा प्रयत्न या संग्रहातून झाला आहे.’’ स्त्रीइतके उत्कट प्रेम पुरुष करू शकत नाही. त्याच्या प्रेमाला मालकी हक्काची किनार असते. स्त्री-पुरुष संबंधातील गुंतागुंत तसेच काही सामाजिक विषय हे या कथासंग्रहातून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे, देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पायगुडे यांनी केले.