नगरसेवकांचे सर्वात आवडीचे काम बाके बसवणे;गुन्हे दाखल झालेले नगरसेवक ६१, मनसेचे सर्वाधिक

महापालिकेच्या सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांच्या गेल्या चार वर्षांतील ‘कामगिरीचा’ लेखाजोखा प्रसिद्ध झाला आहे. तब्बल ८४ नगरेसवकांनी गेल्या चार वर्षांत मुख्य सभेसाठी एकही लेखी प्रश्न विचारला नसल्याचे स्पष्ट झाले असून, बाकडी बसवणे हे नगरसेवकांचे सर्वात आवडीचे काम असल्याचीही माहिती समोर आली आहे. विविध पक्षांच्या ६१ नगरसेवकांवर वेगवेगळे गुन्हे दाखल असून, त्यात मनसेचे सर्वाधिक १५ नगरसेवक आहेत.

‘परिवर्तन’ या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते गेले पाच महिने नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक तयार करण्याचे काम करत होते. त्याचे प्रकाशन शुक्रवारी झाले. या  प्रगतिपुस्तकाची माहिती परिवर्तनचे अध्यक्ष तन्मय कानिटकर तसेच अंकिता अभ्यंकर आणि यतीश देवाडिगा यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडून आलेल्या १५२ नगरसेवकांच्या १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च १६ या कालावधीतील कामगिरीचा हा अहवाल आहे.

नगरसेवकांनी त्यांच्या हातात असलेल्या वॉर्डस्तरीय निधीचा वापर कसा केला, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांची उपस्थिती किती राहिली, सभेसाठी त्यांनी किती लेखी प्रश्न दिले आणि नगरसेवकांवर कोणकोणते गुन्हे दाखल आहेत या चार निकषांच्या आधारे नगरसेवकांच्या कामगिरीचा अहवाल तयार करण्यात आल्याचे कानिटकर यांनी सांगितले. ही सर्व माहिती संस्थेने माहिती अधिकारात घेतली आहे.

सर्व नगरसेवकांनी चार वर्षांंत एकूण ५९ कोटी ९४ लाख १५ हजार ६५३ रुपये इतका वॉर्डस्तरीय निधी वापरला आहे. त्यापैकी सर्वाधिक खर्च शहरात विविध ठिकाणी बाके बसवण्यावर झाला आहे.

या कामासाठी एकूण खर्चाच्या १८ टक्के म्हणजे ११ कोटी रुपये एवढा खर्च झाला आहे. चार वर्षांंत १४० नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात बाके बसवण्याचे काम केले आहे. त्या बरोबरच दिशादर्शक फलक, नामफलक आदींसाठी चार कोटी ३१ लाख एवढा खर्च चार वर्षांंत झाला आहे. चार वर्षांंत सरासरी प्रत्येक नगरसेवकाने सरासरी ४० लाखांची कामे वॉर्डस्तरीय निधीतून केली आहेत.

नगरसेवकांना मुख्य सभेसाठी लेखी प्रश्न देता येतात. त्यांची उत्तरे छापील स्वरुपात येतात, तसेच त्या प्रश्नांवर सभेत चर्चाही करता येते. मात्र तब्बल ८५ नगरसेवकांनी चार वर्षांंत सर्वसाधारण सभेला एकही लेखी प्रश्न दिलेला नाही. गेल्या म्हणजे २०१२ च्या नगरसेवक प्रगतिपुस्तकात प्रश्न न विचारणाऱ्या नगरसेवकांची संख्या ४५ होती. महापालिका सभेसाठी सर्वाधिक १०९ प्रश्न शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांनी दिले. त्यांच्यानंतर विजया वाडकर यांचा क्रमांक लागतो. त्यांनी ५८ प्रश्न दिले.

  • महापालिका सभेतील सर्वाधिक उपस्थिती

माधुरी सहस्त्रबुद्धे- ९८.०६ टक्के

अशोक हरणावळ- ९७.३१ टक्के

  • सर्वात कमी उपस्थिती

शशिकला आरडे- २०.६८ टक्के

सतीश लोंढे- ४२.८३ टक्के

  •  १५२ पैकी ६१ नगरसेवकांवर वेगवेगळे गुन्हे दाखल 

मनसे- १५, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी १४,

भाजप- १२, शिवसेना- ५, आरपीआय- १

  • नगरसेवकांचा अहवाल पाहण्यासाठी  nagarsevak.info