परावलंबी अवस्थेत कृत्रिम उपायांनी अनिश्चित काळापर्यंत मरण लांबवू नये यासाठी इच्छामरण हा अधिकार मिळावा याकरिता, जनजागृती करण्याबरोबरच काही ज्येष्ठ नागरिकांची वैद्यकीय इच्छापत्रे भरून घेत न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे.
४२ वर्षे कोमामध्ये असलेल्या अरुणा शानभाग यांच्या निधनामुळे इच्छामरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे हा अधिकार ज्येष्ठ नागरिकांना मिळावा यासाठी लोकांमध्ये जागृती घडविण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांनी सोमवारी सांगितले. इच्छामरणाच्या या संकल्पनेला ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, डॉ. मंगला नारळीकर, उद्योजिका आणि खासदार अनु आगा, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दीपा श्रीराम, अतुल कुलकर्णी, किरण यज्ञोपवित, लेखिका आशा बगे, मंगला आठलेकर यांनी पाठिंबा दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
संपत्ती आणि मिळकतीचे इच्छापत्र हे माणसाच्या मृत्यूनंतर कार्यवाहित होते. मात्र, वैद्यकीय इच्छापत्र हा माणसाच्या मरणाचा नाही, तर त्याच्या गुणवत्तापूर्ण जगण्याचा विचार आहे, असे सांगून विद्या बाळ म्हणाल्या,की ज्येष्ठ नागरिकांचे बरेचसे आयुष्य जगून झालेले असते. वृद्धापकाळाने शक्ती आणि स्मरणशक्ती कमी होत जाते. ज्या गुणवत्तेने आयुष्य जगलो त्याच गुणवत्तेने मरण यावे ही त्याची इच्छा असते. कायद्यामध्ये आत्महत्या हा गुन्हा आहे. मात्र, वैद्यकीय इच्छापत्र भरलेल्या व्यक्तीला इच्छामरणाचा अधिकार मिळावा. कृत्रिम उपायांनी माझे जीवन लांबवू नये ही इच्छा या वैद्यकीय इच्छापत्रामध्ये नमूद करण्यात आली आहे. परावलंबी अवस्थेतील रुग्णाची अनिश्चित काळापर्यंत सेवा करणे घरच्यांनाही आर्थिकदृष्टय़ा सोयीचे होत नाही. या विषयावर जनजागृती घडवून समाजातील मान्यवरांसह ज्येष्ठ नागरिकांची इच्छापत्रे भरून घेण्यात येणार आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये या वैद्यकीय इच्छापत्रांसह न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे.

सन्मान इच्छामरणाचा
प्रियदर्शनी क्रीडा प्रतिष्ठानतर्फे १ जून रोजी ‘सन्मान इच्छामरणाचा’ या विषयावर परिसवांद आयोजित करण्यात आला आहे. अण्णा भाऊ साठे नाटय़गृह येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात विद्या बाळ, डॉ. शिरीष प्रयाग, अॅड. रमा सरोदे, किरण यज्ञोपवित, डॉ. रोहिणी पटवर्धन आणि अॅड. असीम सरोदे सहभागी होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकांत जाधव यांनी दिली. डॉ. सतीश देसाई आणि रवी चौधरी या वेळी उपस्थित होते.