श्रीकांत केळकर (प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ-छायाचित्रकार)

‘वाचनाच्या गोडीतून मी घडलो. नेत्रतज्ज्ञ म्हणून काम करतानाच आकाश निरीक्षण आणि छायाचित्रण या छंदांची आवड मनापासून जोपासली. कामाचा कितीही व्याप असला, तरी त्यातून सवड काढून मी दररोज वाचन करतोच. हे छंद जोपासण्यासाठी आणि त्यामध्ये प्रगती साधण्यासाठी मला वाचनच उपयोगी पडले.’

शुक्रवार पेठेतील राजा दिनकर केळकर संग्रहालय आणि केळकर ऑप्टिशियन अशा दोन वेगवेगळ्या क्षेत्रांशी माझा लहानपणी जवळचा संबंध आला, तो म्हणजे माझे काका आणि वडील यांच्यामुळे. लहानपणी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि स्लो सायकिलगसारख्या खेळांमध्ये भाग घेत मी अनेक बक्षिसे मिळविली. परंतु पुढे अभ्यास करून नेत्रतज्ज्ञ, आकाश निरीक्षक आणि छायाचित्रकार होण्यापर्यंतचा प्रवास काहीसा वेगळा होता. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण सुरु असताना ‘दांडगी मुलं’ म्हणून आमची ओळख. परंतु पुढे आकाश निरीक्षण, विज्ञान आणि छायाचित्रणाचा छंद जडला आणि एक नेत्रतज्ज्ञ असूनही मी छायाचित्रांच्या दुनियेतील वाचनानुभवाचा आस्वाद घेऊ लागलो.

आदर्श विद्यालयात माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर भावे हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षणाकरिता प्रवेश घेतला. त्या वेळी वाचनाला थोडीफार सुरुवात झाली, असे म्हणावे लागेल. सुरुवातीला शं. रा. देवळे यांचे ‘बडा नाना छोटा नाना’, ‘चंदू’ यांसारखी पुस्तके वाचनात आली. महाविद्यालयात असताना फुटबॉल, क्रिकेट हे आवडते खेळ. पण आकाश निरीक्षणाची आवड आणि हाती पडलेल्या दुर्बणिीच्या साहाय्याने त्या क्षेत्राकडे छंद म्हणून वळालो. यादरम्यान आकाश निरीक्षणाशी निगडित अनेक पुस्तकांचे वाचन करीत होतो. कालांतराने पुण्यामध्येच के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये कामाला सुरुवात केली आणि ‘नेत्र’ या विषयावरील पहिली एम. एस.ची पदवी मिळविली. या काळात आकाश निरीक्षणासोबतच पशुपक्ष्यांची छायाचित्रे काढण्याचा छंद मला लागला. त्यामुळे डॉ. शिरीष भावे, आयुकाचे अरिवद परांजपे आणि आदित्य पोंक्षे यांच्यासोबत ‘आकाशमित्र’ संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत तज्ज्ञ मंडळींची व्याख्याने आणि चर्चासत्र आयोजित केली जात.

‘आकाशमित्र’तर्फे १९९३ मध्ये ‘आकाशमित्र’ नावाचेच त्रमासिकही सुरू केले. त्यामध्ये मी आणि आमचे इतर सभासद आम्ही लेखन करीत असू. आपल्या लेखनाला योग्य माहितीची जोड असावी, असा माझा कटाक्ष असे. त्यामुळे त्याविषयासंबंधी नानाविध पुस्तकांचे वाचन करून त्याच्या नोंदी मी काढत होतो. शेरलॉक होम्स या पुस्तक मालिकेच्या वाचनाने माझी वेगळी दृष्टी तयार झाली. याशिवाय ‘निसर्गसेवक’, ‘पक्षी’, ‘बेटर फोटोग्राफी’ अशी अनेक पुस्तके माझ्या संग्रही आहेत. वन्यजीव म्हणजेच वाईल्ड लाईफ फोटोग्राफीला सुरुवात झाल्यानंतर विविध पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवित होतो. त्यांपकी एका प्रदर्शनात तुमच्या छायाचित्रांचा समावेश करून दिनदर्शिका साकारावी अशी कल्पना एकाने सुचविली. त्यानुसार माझ्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी (एनटीओ) या संस्थेची दिनदर्शिका साकारली. छायाचित्रांची चार प्रदर्शने पुण्यामध्ये आणि एक प्रदर्शन सोलापूरमध्ये भरविले होते. ज्या पक्ष्यांची आपण छायाचित्रे टिपतो त्यांची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे, असे मला वाटे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून अनेक दुर्मीळ पक्ष्यांची माहिती आणि पुस्तकेही मी शोधून काढली. त्यांचे सातत्याने वाचन करुन नोंदी ठेवण्याचाही मी प्रयत्न केला.

[jwplayer B50wLQb5]

नेत्रतज्ज्ञ म्हणून कार्यरत असताना डोळ्यांच्या दृष्टीने सर्व काही या पुस्तकाचे लेखन माझ्या हातून झाले. डॉ. ह. वि. सरदेसाई यांच्या हस्ते त्या पुस्तकाचे प्रकाशन आणि वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांची प्रकाशन कार्यक्रमाला लाभलेली उपस्थिती हा क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर तितकाच ताजा आहे. नेत्रविषयक माहितीची विविध मासिके आणि साप्ताहिके सातत्याने संस्थेमध्ये येतात. त्यामुळे नवनवीन संकल्पना आणि तंत्रज्ञानाची माहिती मिळविण्याकरिता त्यांचे वाचन सुरू असते. तर, छायाचित्रण हा छंद असल्याने त्याविषयीची दुर्मीळ पुस्तके ढुंढाळण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. त्याकरिता पुणे स्टेशन परिसरात असलेल्या जुन्या दुकानांमधून अनेक पुस्तके मी खरेदी केली आहेत. नव्या लेन्स आणि कॅमेरे याविषयीची मासिके देखील माझ्याकडे आहेत. आपण सतत अपडेट असावे, असे मला वाटते. त्यामुळे पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रातील लेख किंवा इंटरनेट या विविध माध्यमांचा वापर मी सातत्याने करतो.

कर्नाटकमधील मंदिरांची वास्तुकला या विषयावर ‘अबोडस् ऑफ द गॉड’ हे छायाचित्र आणि माहितीचे पुस्तक मी लिहिले. त्यामध्ये कर्नाटकमधील वास्तुकलेविषयी छायाचित्रांचा समावेश आहे. त्याकरिता ‘टेम्पल्स ऑफ इंडिया’सारखी नानाविध पुस्तके मी वाचली. तसेच, इंटरनेटवरुन माहिती मिळविण्यासोबतच तेथील स्थानिकांकडून मंदिरांविषयीचा इतिहास जाणून घेतला. कर्नाटकमधील वास्तुकलेविषयीच्या साहित्यासोबतच ‘हिमाचल प्रदेश’, ‘टी ३’, ‘दर्शन उगवत्या महासत्तेचे’, ‘खजुराहो’, ‘बर्डस् ऑफ पुणे’, ‘नेम्स ऑफ इंडियन बर्डस्’ अशी अनेक पुस्तके माझ्या बुकशेल्फमध्ये आहेत. याशिवाय ‘स्वामी’ कादंबरी आणि कालिदासाचे ‘मेघदूत’ मी वाचले आहे. बाहेरच्या देशात गेल्यावर तेथील पदपथांवरुन पुस्तकांची खरेदी मी करतो. प्रत्येक ऐतिहासिक स्थळांची माहिती, वर्णन आणि इतिहास आपल्याकडे असावा, याकरिता तेथील छोटय़ा पुस्तिका आणि इतर उपयुक्त साहित्य मी माझ्या संग्रहासाठी एकत्रित केले आहे. पुणे आणि परिसरात खूप मोठय़ा प्रमाणात निसर्गसौंदर्य आहे. त्यामुळे छायाचित्रणासाठी बाहेर पडताना ‘बर्डस् ऑफ लोणावळा अँड खंडाळा’ सारखी पुस्तके माझ्या कॅमेरा सॅकमध्ये नेहमी असतात. प्रत्येक क्षेत्रात वाचन महत्त्वाचे आहे. ते आपण कशा पद्धतीने करतो, हे महत्त्वाचे नाही. सध्या पुस्तकांप्रमाणेच इंटरनेट हे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे छायाचित्रांच्या दुनियेत फिरताना मी सर्वच साहित्याचा आणि साधनांचा उपयोग करुन माझ्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करीत आहे.

[jwplayer m2s7dj9l]