पुण्याच्या ‘फिल्म इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या सात विद्यार्थ्यांचे चित्रपट यंदा ‘इफ्फी’त (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) झळकणार आहेत. ‘इफ्फी’तील विद्यार्थी विभागासाठी या चित्रपटांची निवड झाली आहे. यातील सहा चित्रपट ‘एफटीआयआय’च्या दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनी बनवले आहेत, तर एक चित्रपट पदविका वर्गाच्या विद्यार्थ्यांचा आहे.
तुषार मोरे (चित्रपट- ‘फिरदौस- पॅराडाईस’), अभिलाष विजयन (‘द्वंद- द डय़ुअल’), अभिषेक वर्मा (‘डब्ल्यू : / एम :’), सुयश बर्वे (‘विवर’), कर्मा तकापा (‘थुत्से क्युमा- ऑर्डिनरी टाईम्स’), संध्या सुंदरम (‘डो- रे- मी- फा’), प्रतीक वत्स (‘आफ्टर डार्क’) या विद्यार्थ्यांनी बनवलेले चित्रपट ‘इफ्फी’त दाखवले जाणार आहेत.
काश्मीरमधील संचारबंदी लागलेल्या एका गावाचे चित्रण ‘फिरदौस’मध्ये करण्यात आले आहे. तर ‘द्वंद्व’मध्ये केशकर्तनालय चालकाच्या मनातील द्वंद्व उभे करण्यात आले आहे. मनातून बंडखोरांना पाठिंबा देणाऱ्या केस कापणाऱ्याच्या दुकानात त्याच बंडखोरांना कंठस्नान घालून आलेला सैनिक येतो. या सैनिकाला मारावे की जाऊ द्यावे अशी त्याची होणारी घालमेल ‘द्वंद्व’मध्ये दाखवली आहे. शहरी जीवनात माणसामाणसांमध्ये नकळत उभ्या राहिलेल्या भिंती आणि या भिंतींमध्ये प्रत्येकाचे असलेले वेगळेच जग ‘डब्ल्यू : / एम :’ मध्ये समोर येते.
‘विवर’ कोकणातील पाश्र्वभूमी असलेली कथा मांडतो. तर स्वत:च्या मनाशी झगडणाऱ्या तीन स्त्रियांची कथा ‘डो- रे- मी- फा’मधून समोर येते.
यापैकी ‘द्वंद’ या चित्रपटाला गेल्या वर्षी ‘लडाख इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये सवरेत्कृष्ट लघुपटाचे, तर ‘झेक रीपब्लिक’ मध्ये झालेल्या ‘इंटरनॅशनल स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘द्वंद्व’साठी साहिल भारद्वाज या विद्यार्थ्यांला सवरेत्कृष्ट चलचित्रणाचे पारितोषिक मिळाले आहे. तसेच ‘फिरदौस’ साठी तुषार मोरे यालाही ‘कोडॅक इंडिया फिल्म स्कूल काँपीटिशन’ मध्ये सवरेत्कृष्ट चलचित्रणासाठीच्या पारितोषिकाने गौरवण्यात आले आहे.