वेगवेगळ्या अडचणींचा टप्पा पार करत आणि बऱ्याच प्रयत्नाने पर्यावरण विभागाचा ‘ना हरकत’ दाखला प्राप्त झाल्यानंतर पिंपरी प्राधिकरणाने वाल्हेकरवाडी येथे ८०० स्वस्तातील घरांची योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शहर भाजपने त्यात खोडा घातल्याने या नियोजित गृहयोजनेला ‘ब्रेक’ लागला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणारा भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की प्राधिकरण प्रशासनावर ओढावली.
पेठ क्रमांक ३०-३२ येथे उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाचे गुरुवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होते. मात्र, या कार्यक्रमास भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला.
आधी नागरी सुविधांची कामे पूर्ण करा, त्यानंतरच नवीन घरांचा प्रकल्प सुरू करा, अशी मागणी त्यांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांच्याकडे केली. हीच भूमिका त्यांनी पालकमंत्र्यांना भेटून सांगितली. शहर भाजपचा विरोध असल्याने भूमिपूजन रद्द होण्याची चिन्हे होती. अपेक्षेप्रमाणे, बापट यांनी भूमिपूजन करण्यास असमर्थता दर्शवली. परिणामी, प्राधिकरण प्रशासनास भूमिपूजनाचा कार्यक्रम लांबणीवर टाकावा लागला.

भाजपच्या या भूमिकेचा कष्टकरी संघर्ष महासंघ निषेध करत आहे. गरिबांना घरे मिळणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे गरिबांना घरे देण्याची घोषणा करतात. इकडे त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते श्रमिकांना घरे मिळू देत नाहीत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चांगल्या योजनेत राजकारण आणू नका.
काशीनाथ नखाते, अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ