आमदार, पदाधिकाऱ्यांचीही अडवणूक; कार्यक्रमस्थळाला छावणीचे स्वरूप; भाजप विरोधकांचे सरकारविरोधी एकत्रित आंदोलन

भारतीय जनता पक्षाच्या चिंचवड येथील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली. प्रवेशिकेशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता. त्यामुळे पदाधिकारी तसेच आमदारांचीही अडवणूक करण्यात आल्याचे दिसून आले. प्रसारमाध्यमांना वार्ताकन करण्यास मनाई करण्यात आली. प्रचंड पोलीस बंदोबस्तामुळे चिंचवड आणि कासारवाडी अशा दोन ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रम स्थळी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. भाजपची ही महत्त्वपूर्ण बैठक सुरू असतानाच विरोधकांनी एकत्र येऊन चिंचवड येथे सरकारविरोधी आंदोलन केले.

चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृह आणि कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे कार्यकारिणीचे कार्यक्रम होते. मोठय़ा संख्येने महत्त्वाच्या व्यक्ती बैठकीस उपस्थित राहणार असल्याने दोन्ही ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कोणालाही प्रवेशिकेशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. नाटय़गृहाचा संपूर्ण ताबा भाजप कार्यकर्त्यांनी घेतला होता आणि तेथील कर्मचाऱ्यांवरही बरीच बंधने घालण्यात आली होती. हेच चित्र हॉटेल कलासागरमध्ये होते. बंदोबस्तासाठी ५५० पोलीस तसेच १०० वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात आले होते.

बैठकीच्या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा पक्षाचे झेंडे व फ्लेक्स लावण्यात आले आहेत. वर्तमानपत्रांमध्ये भल्या मोठय़ा जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. तथापि, प्रसारमाध्यमांना दोन्हीकडे प्रवेश नाकारण्यात आला. छायाचित्रकारांना काही छायाचित्रे घेण्याची मुभा देण्यात आली. वार्ताकन करण्यास पत्रकारांना मनाई करण्यात आली होती, मात्र संध्याकाळी प्रवेश देण्यात आला. सकाळी अकराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टरने सांगवी येथे आगमन झाले. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते मोटारीने कलासागरला बैठकीसाठी आले.

दुसरीकडे, चिंचवड स्टेशन येथे भाजप सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात एकत्र येत विविध पक्ष व संघटनांनी संयुक्त आंदोलन केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, नाना काटे, काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, शहराध्यक्ष सचिन साठे, महिला अध्यक्षा गिरिजा कुदळे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी नगरसेवक मारुती भापकर, भाऊसाहेब भोईर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, प्रकाश जाधव, अभिमन्यू पवार, देवेंद्र तायडे, शब्बीर शेख, रफिक कुरेशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.