‘स्मार्ट सिटी’ योजनेत नवी मुंबई महापालिका सहभागी होणार नसल्यास राज्य सरकार पिंपरी-चिंचवडचा प्राधान्याने विचार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीत समावेश व्हावा आणि शास्तीकर रद्द करावा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत, ‘स्मार्ट सिटी’साठी अनुत्सुक असलेल्या नव्या मुंबईऐवजी मुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडचा समावेश करावा, अशी मागणी जगताप यांनी केली.

याबाबतची माहिती जगतापांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, केंद्र सरकारने देशातील १०० शहरांची ‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी निवड केली आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील १० शहरे आहेत. निकष पूर्ण केल्यानंतर या शहरांचा ‘स्मार्ट सिटी’त टप्प्याटप्प्याने समावेश केला जात आहे. नव्या मुंबईचा या दहामध्ये समावेश आहे. अन्य नऊ शहरे योजनेचे निकष पूर्ण करत असताना नवी मुंबई महापालिका मात्र त्यासाठी प्रयत्न करत नाही, असे चित्र आहे.

तेथील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस नव्या मुंबईचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश करण्याबाबत नकारात्मक सूर आळवित आहे. त्यामुळे ही महापालिका ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.

अशा परिस्थितीत अन्य एका शहराचा या योजनेत समावेश होऊ शकतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या समावेशासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नवी मुंबई सहभागी होणार नसल्यास पिंपरी-चिंचवडचा विचार प्राधान्याने होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.