तीन गावांच्या पट्टय़ात आठ नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात

प्रभाग क्र. ३०, दापोडीफुगेवाडीकासारवाडी

दापोडी, फुगेवाडी आणि कासारवाडी अशा तीन गावांच्या मिळून तयार झालेल्या सलग पट्टय़ातील या प्रभागात एक-दोन नव्हे तर तब्बल आठ नगरसेवक िरगणात राहणार आहेत. त्यातील चार जणांना घरी बसावे लागणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये चढाओढ असून ‘वजनदार’ काटे परिवारात नाटय़मय घडामोडी सुरू आहेत. गेल्या वेळी तीन काटे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यातील दोघांना आता भाजपचे वेध लागले आहेत. ‘गावकी-भावकी’चे राजकारण हे येथील वैशिष्टय़ राहणार असून कोण कुठल्या गटात आणि कोणत्या पक्षाची उमेदवारी घेतो, त्यावरच ‘क्रॉस वोटिंग’चे प्रमाण ठरणार आहे.

झोपडपट्टी परिसराचे जास्त प्रमाण, तीन गावची तीन गावठाणे, दाट लोकवस्ती असलेल्या या प्रभागावर सध्या राष्ट्रवादीचे पूर्ण वर्चस्व दिसते. राजेंद्र काटे, संजय काटे, रोहित काटे, चंद्रकांता सोनकांबळे, संध्या गायकवाड, आशा शेंडगे, किरण मोटे, रमा ओव्हाळ या आठ नगरसेवकांच्या प्रभागाचे क्षेत्र या नव्या प्रभागात समाविष्ट आहे.

रमा ओव्हाळ यांचे पती सनी ओव्हाळ िरगणात उतरणार आहेत. स्वीकृत प्रभाग सदस्य सतीश काटे, माजी नगरसेवक अविनाश काटे यांच्या पत्नी अनुजा काटे, माजी नगरसेविका स्वाती काटे यांचीही चाचपणी सुरू आहे. भाजपकडून ओबीसी प्रवर्गात शेंडगे तर राखीव जागेतून सोनकांबळे यांना उमेदवारीसाठी स्पर्धा दिसत नाही. खुल्या गटात व महिला जागेसाठी दोन्हीकडे तीव्र स्पर्धा आहे.

रिपाइंच्या नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे १९९४ पासून २१ वर्षे नगरसेविका आहेत. पुणे व िपपरी महापालिकेत त्यांनी दापोडीचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदा त्या भाजपच्या पॅनेलमध्ये असणार आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र काटे भाजपच्या वाटेवर आहेत. २००२ मध्ये पॅनेल पद्धतीचा फटका बसलेले राजेंद्र काटे नंतर भावकीतील उमेदवारांचा पराभव करून दोन वेळा निवडून आले. संजय काटे मूळ काँग्रेसचे. गेल्या वेळी त्यांचे काँग्रेसचे तिकीट निश्चित होते. मात्र, अजित पवारांनी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देऊ केल्याने इच्छा नसतानाही त्यांनी राष्ट्रवादीचे तिकीट स्वीकारले. मात्र, ते निवडून आले. सनी ओव्हाळ यापूर्वी काँग्रेसचे नगरसेवक होते. दोन वेळा खुल्या गटात काटय़ांकडून पराभूत झाल्यानंतर ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर राखीव जागेतून निवडून आले होते. काँग्रेसच्या माजी  नगरसेविका स्वाती काटे यांची एकाच वेळी राष्ट्रवादी तसेच भाजपकडूनही चाचपणी सुरू आहे.