नगरसेवकांची ‘चमकोगिरी’

पिंपरी महापालिकेच्या निवडणुकांचे रणिशग वाजले असून मतदारांशी शक्य त्या मार्गाने संपर्क करण्याचा प्रयत्न इच्छुक उमेदवारांनी चालवला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, विद्यमान नगरसेवकांनी महापालिकेच्या खर्चाने होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये स्वत:ची ‘चमकोगिरी’ करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातही सत्ताधारी नगरसेवक आघाडीवर आहेत. महापालिकेच्या पैशांवर नगरसेवकांचा हा निवडणूक प्रचाराचा थाट नागरिकांमध्ये मात्र थट्टेचा विषय बनला आहे.

पिंपरी महापालिकेच्या निवडणुकांना जेमतेम पाच महिने राहिले आहेत. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत. विद्यमान नगरसेवकांनी पुन्हा निवडून येण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून त्यासाठी महापालिकेचे कार्यक्रम हा त्यांना मोठा ‘आधार’ वाटत आहे. महापालिकेच्या वतीने लाखो-करोडो रुपये खर्च करून राबवण्यात येणाऱ्या विविध योजना आपणच राबवत असल्याच्या थाटात वावरणारे नगरसेवक आता पालिकेच्या वतीने होणारे कार्यक्रमही आपण आयोजित केल्याचा आभास निर्माण करत आहेत.

महापौर चषकाच्या नावाखाली होणाऱ्या विविध स्पर्धामधून हेच चित्र शहरात पुढे आले. जयंत्या, महोत्सव तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या गोष्टी ठळकपणे दिसून येत आहेत. पालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे चित्र नव्याने आणि ठळकपणे दिसून आले.

पिंपरीगावात ‘कॉमेडी एक्सप्रेस’मधील कलावंतांचा सहभाग असलेला विनोदी कार्यक्रम आणि चिंचवडगावात झालेला गायक अजित कडकडे यांच्या गायनाचा कार्यक्रम, हे दोन मुख्य कार्यक्रम होते. दोन्ही कार्यक्रमांना रसिकांची प्रचंड गर्दी झाली होती. अशावेळी मतदारांसमोर आयतेच झळकण्याची संधी राजकीय मंडळींनी सोडली नाही.

दोन्ही ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी करायची तितकी स्वत:ची प्रसिद्धी केली. नगरसेवकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठमोठे फलक लावले होते.

मतदारांना घरोघरी निमंत्रणे पाठवण्यात आली होती. अन्य इच्छुकांनीही चहुबाजूने फ्लेक्सबाजी करत शक्य तितकी चमकोगिरी केली. पालिकेच्या खर्चाने होत असलेला विद्यमान नगरसेवकांचा चमकोगिरीचा हा प्रयत्न अन्य इच्छुकांच्या दृष्टीने अडचणीचा ठरणारा होता. त्यामुळे त्यांच्याकडून या प्रकाराची खिल्ली उडवली जात होती.

प्रारूप प्रभाग रचनेवर ४२ हरकती सूचना

महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत निश्चित झाल्यानंतर त्या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे नऊ दिवसांमध्ये ४२ हरकती-सूचना आल्या आहेत. प्रभाग रचनेच्या हद्दीबाबत नागरिकांनी सर्वाधिक आक्षेप नोंदविले आहेत.

महापालिकेच्या चार सदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत आणि प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. त्यावर हरकती-सूचना नोंदविण्याची प्रक्रियाही सुरू झाली असून येत्या २५ ऑक्टोबपर्यंत नागरिकांना हरकती-सूचना नोंदविता येणार आहेत. महापलिकेच्या मुख्य इमारतीसह, सर्व पंधरा क्षेत्रीय कार्यालये आणि ऑनलाईन सेवा त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार नव्या प्रभागांच्या हद्दीबाबत नागरिकांनी आक्षेप नोंदविले असून प्रभागातील आरक्षणही चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

मतदार नावनोंदणी आणि दुरुस्ती अभियानाअंतर्गत आतापर्यंत २६ हजार अर्ज प्रशासनाकडे आले आहेत. येत्या २१ ऑक्टोबपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.