राज्यातील सरकार नोटीस पिरियडवर आहे. २३ तारखेला मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह इतर महापालिकांचा निकाल जाहीर होईल. त्यानंतर तो नोटीस पिरियड कोणत्याही क्षणी संपेल, असा सूचक इशारा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपला दिला आहे.

भाजप ज्या क्रूर पद्धतीने वागत आहे; किंबहुना अत्यंत कपट नीतीने भाजपचा कारभार चाललेला आहे, ते पहिल्यानंतर त्या ठिकाणी भाजपबरोबर शिवसेनेने राहणे म्हणजे जनतेशी विश्वासघात केल्यासारखे आहे. त्यामुळे यावर उद्धव ठाकरे नक्कीच पुनर्विचार करतील, असे खासदार विनायक राऊत म्हणाले. चिंचवड येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष राहुल कलाटे, संपर्क प्रमुख अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे आदी उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नुकतेच सरकार नोटीस पिरियडवर असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. बदलत्या राजकीय घडामोडीत शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेणार का, या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य करून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच हार्दिक पटेल याने ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ११ गुजराती उमेदवारांना तिकीट दिले असून त्यात पटेल यांच्या एका मित्राचाही समावेश आहे. त्यामुळे मित्राचा प्रचार करण्यासाठी पटेल मुंबईत आला असता, त्याने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यातील सरकारचा पाठिंबा काढणार का, या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर दिले नव्हते. पण सरकार नोटीस पिरियडवर आहे, असे विधान त्यांनी केले होते. योग्य वेळी मी जाहीर करेन, असेही ते म्हणाले होते. त्यात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा नोटीस पिरियड कधीही संपेल असे सांगून राज्य सरकार सत्तेतून बाहेर पडण्याच्या शक्यतेला अधिक बळकटी मिळाली आहे, असे बोलले जात आहे.